शिक्षण सोडले तर व्हिसा रद्द होईल; भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:10 IST2025-05-27T16:08:06+5:302025-05-27T16:10:51+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशातील विद्यार्थ्यांना आणखी एक झटका दिला आहे. विद्यार्थ्यांनी जर शिक्षण सोडले तर त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात येणार आहे.

शिक्षण सोडले तर व्हिसा रद्द होईल; भारतीय आणि परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकेचा इशारा
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशातील विद्यार्थ्यांना आणखी एक झटका दिला आहे.आता एखाद्या विद्यार्थ्याने सूचना न देता शिक्षण बंद केले तर त्या विद्यार्थ्याचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. अमेरिकेत बेकायदेशीर स्थलांतरितांवर सुरू असलेल्या कारवाई आणि मोठ्या प्रमाणात हद्दपारीच्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे.
जर या विद्यार्थ्यांनी माहिती न देता त्यांचा अभ्यासक्रम सोडला तर त्यांचा विद्यार्थी व्हिसा रद्द होऊ शकतो. दरम्यान, आता भारतातील अमेरिकन दूतावासाने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. या निवेदानात म्हटले आहे की, "जर तुम्ही तुमच्या विद्यापीठाला सूचना न देता एखादा अभ्यासक्रम सोडला, वर्ग चुकवले किंवा तुमच्या अभ्यास कार्यक्रमातून माघार घेतली तर तुमचा विद्यार्थी व्हिसा रद्द केला जाऊ शकतो. यामुळे तुम्हाला भविष्यात अमेरिकन व्हिसा मिळण्यापासून रोखले जाईल. तुमच्या व्हिसाच्या अटींचे नेहमी पालन करा आणि कोणत्याही समस्या टाळण्यासाठी विद्यार्थी दर्जा कायम ठेवा.
अवघ्या ३७ हेक्टरचा देश, राहतात ३०० लोक; तरीही बेटावर चीनचा डोळा! काय आहे नेमकं कारण?
परदेशी विद्यार्थ्यांविरुद्धचे धोरण आणखी कडक केले
मागील काही दिवसापासून अमेरिकेत परदेशी विद्यार्थ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व्हिसा अचानक आणि पूर्वसूचना न देता रद्द केले जात आहेत. काही प्रकरणे पॅलेस्टाईन समर्थक निदर्शनांमध्ये सहभाग, वाहतूक नियमांचे उल्लंघन किंवा व्हिसा अटींचे उल्लंघन अशा विविध कारणांशी जोडली आहेत. ट्रम्प प्रशासनाने परदेशी विद्यार्थ्यांविरुद्धचे धोरण आणखी कडक केले आहे.
काही दिवसापूर्वी हार्वर्ड विद्यापीठाला नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची परवानगी नाकारण्यात आली, यामुळे हजारो विद्यार्थ्यांना फटका बसला. यामध्ये सुमारे ७८८ भारतीय विद्यार्थी होते.
अनेकवेळा विद्यार्थ्यांची माहिती SEVIS मधून काढून टाकण्यात आल्याची माहिती विद्यार्थ्यांना आणि विद्यापीठाला माहित नसते. SEVIS ही एक वेब-आधारित प्रणाली आहे. ही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेच्या गृह सुरक्षा विभागाद्वारे चालवली जाते. हा इशारा भारतीय विद्यार्थ्यांसाठी विशेषतः महत्त्वाचा आहे. कारण अमेरिकेत ३ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.