बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 00:07 IST2025-12-25T00:06:51+5:302025-12-25T00:07:31+5:30
Bangladesh News: गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये सुरू असलेले हिंसाचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. बुधवारी संध्याकाळी बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका ठिकाणी पेट्रोल बॉम्बच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात हल्ला करून मोडतोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.

बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये सुरू असलेले हिंसाचाराचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही आहे. बुधवारी संध्याकाळी बांगलादेशची राजधानी ढाका येथे एका ठिकाणी पेट्रोल बॉम्बच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात हल्ला करून मोडतोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.
ढाका विद्यापीठातील मधुर कँटिनमध्ये बुधवारी मोडतोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. काझी नझरुल इस्लामच्या घोषणा देत असलेल्या एका व्यक्तीने कँटिनमध्ये घुसून मोडतोड केली. मात्र ढाका विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी या हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
मधुर कँटिनची सुरुवात १९२१ मध्ये मधुसुदन डे यांनी ढाका विद्यापीठात केली होती. हे कँटिन भाषा आंदोलन आणि १९७१ च्या युद्धाचं केंद्र बनलं होतं. दरम्यान, मार्च १९७१ मध्ये ऑपरेशन सर्चलाईटदरम्यान, पाकिस्तानी सैन्याने मधुसुदन डे यांची हत्या केली होती. तेव्हापासून हे कँटिन बांगलादेशचं आंदोलन, राष्ट्रीय इतिहास आणि वारशाचं प्रतीक बनलं होतं.
दरम्यान, या हल्ल्यापूर्वी आज संध्याकाळी नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाका येथील मोघबाजारामध्ये काही समाजकंटकांनी पेट्रोल बॉम्बद्वारे स्फोट घडवून आणले. या स्फोटामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या स्फोटात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा नाव सैफुल सियाम असं आहे. रात्री सातच्या सुमारास वायरलेस गेट एरियाजवळ बांगलादेश फ्रीडम फायटर्स कौन्सिलच्या समोर हा स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा बॉम्ब फ्लायओव्हरवरून फेकण्यात आला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.