हेलिकॉप्टर जवळपास लँड झालंच होतं, अचानक घेतली गिरकी, पार उलटं झालं! नेपाळमधील अपघाताचा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 15:39 IST2026-03-18T15:39:00+5:302026-03-18T15:39:33+5:30
हेलिकॉप्टरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण प्रवास करत होते, जे काठमांडू येथून आपल्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी खोटांगला जात होते.

हेलिकॉप्टर जवळपास लँड झालंच होतं, अचानक घेतली गिरकी, पार उलटं झालं! नेपाळमधील अपघाताचा Video व्हायरल
नेपाळच्या खोटांग जिल्ह्यात बुधवारी एक मोठी दुर्घटना टळली. 'एअर डायनेस्टी'चं एक हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान अचानक उलटल्याने मोठा अपघात झाला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकाच कुटुंबातील पाच जण प्रवास करत होते, जे काठमांडू येथून आपल्या नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी खोटांगला जात होते.
ज्या कुटुंबावर आधीच दुःखाचा डोंगर कोसळला होता, त्यांच्यासाठी हा अपघात भयंकर घटना होती. मनमछी राई यांचं युकेमध्ये निधन झालं होतं आणि त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी नेपाळला आणण्यात आला होता. हेलिकॉप्टरमध्ये जागा कमी असल्याने मृतदेह गाडीने पाठवण्यात आला, तर कुटुंबातील पाच सदस्य हेलिकॉप्टरने खोटांगला जात होते. याच प्रवासादरम्यान लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला.
नेपाल में लैंड करते समय हेलीकॉप्टर क्रैश कर गया।
— Narendra Nath Mishra (@iamnarendranath) March 18, 2026
चमत्कारिक ढंग से पायलट और सभी पाँच पैसेंजर बाल बाल बच गए! pic.twitter.com/rXFunNTn64
नेपाळ नागरी उड्डाण प्राधिकरणाने (CAAN) दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने सकाळी ११ वाजता काठमांडू येथून उड्डाण केलं होतं. ५० मिनिटांनंतर जेव्हा हे हेलिकॉप्टर खोटांगमधील केपिलासगढी येथे लँड होत होतं, तेव्हा काही तरी बिघाड झाला आणि ते जमिनीवर पडलं. या थरारक अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पायलटसह सर्व प्रवासी सुरक्षितपणे बाहेर आले, फक्त काजीबहादुर राई नावाच्या व्यक्तीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघातानंतर लगेचच कंपनीने दुसरं हेलिकॉप्टर पाठवलं आणि जखमी काजीबहादुर यांना रेस्क्यू करून पुन्हा काठमांडूला आणलं गेलं. आपल्या पत्नीला अखेरचा निरोप देण्यासाठी जात असलेल्या काजीबहादूर यांच्यासाठी हा क्षण अत्यंत कठीण होता, परंतु मृत्यूच्या दारातून सर्वजण सुखरूप वाचले हीच मोठी गोष्ट ठरली आहे.