Video : "टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही"; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:53 IST2025-05-29T18:51:13+5:302025-05-29T18:53:41+5:30
पाकिस्तानमध्ये आता पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनाच आता पण्याची समस्या त्रस्त करत आहे.

Video : "टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही"; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे परिणाम आता संपूर्ण पाकिस्तानला भोगावे लागत आहेत. पाकिस्तान दहशतवादाला आश्रय देत असल्याने भारताने सिंधु करार स्थगित केला. परिणामी पाकिस्तानमध्ये आता पाण्याचा तुटवडा भासू लागला आहे. सामान्य माणसांपासून ते अगदी सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनाच आता पण्याची समस्या त्रस्त करत आहे. नुकताच पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती विमानतळावर पाणी नसल्याचं म्हणत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमधील ही महिला पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री हिना बेयात असल्याचे म्हटले जात आहे. तिने पाकिस्तानच्या सध्य परिस्थितीवरून सरकारला चांगलेच बोल सुनावले आहेत. पाकिस्तानचे सगळ्यात जास्त रेलचेल असणारे विमानतळ म्हणजे जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळ. पण, याच विमानतळावरच्या स्वच्छतागृहांमध्ये अजिबात पाणी नाहीये. त्यामुळे आता पाकिस्तानमधला पाणी प्रश्न सगळ्यांसामोर आला आहे. यापूर्वी पाकिस्तान सरकारने अशी कोणतीच समस्या नसल्याचे म्हटले होते.
देशाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी नाही!
हिना यांनी हा व्हिडीओ त्याच दिवशी रेकॉर्ड केला आहे, ज्या दिवशी पाकिस्तान यौम-ए-तकबीर म्हणजेच १९९८ च्या अणुचाचणीचा वर्धापन दिन साजरा करत होता. "ज्या दिवशी पाकिस्तान आपल्या विजयाचा सोहळा करतोय, त्याच दिवशी देशाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरील स्वच्छतागृहांमध्ये पाणी नाही. लोकांना नमाज अदा करायची आहे, लहान मुलांना टॉयलेटला जायचे आहे, पण स्वच्छतागृहांमध्ये पाणीच नाही", असे या व्हिडीओमध्ये तिने म्हटले आहे.
No water in washrooms of Int'l Airport in #Karachi!
— ManhasAnupama (@manhas_anupama) May 29, 2025
A Pakistani Women exposing the failures of system in Pakistan, Pak making big statements of major project development, but even basic amenities are missing in its Airports...its a big shame!#FailedStatePakistan@amritabhinderpic.twitter.com/5yjnVZFthM
व्यवस्था इतकी बिघडली आहे का?
या व्हिडीओमध्ये महिला पुढे म्हणते की, "पाकिस्तानात सध्या नव्या ट्रेन्स, मेट्रो आणि वेगवेगळ्या योजनांचे दावे केले जात आहेत. मात्र, त्यात काहीच तथ्य दिसत नाही. इकडे साधं टॉयलेटमध्ये पाणी नाही. आपले विमानतळ अधिकारी, संस्थान आणि इथली व्यवस्था इतकी बिघडली आहे का? कोणताच नेता किंवा अधिकारी आपली चूक कबूल करण्यास तयार नाही."