Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 08:29 IST2025-12-29T08:29:04+5:302025-12-29T08:29:29+5:30
हॅमंटन सिटी एअरपोर्टच्या वर ही दुर्घटना घडली. सकाळी ११:२५ च्या सुमारास दोन एनस्ट्रॉम बनावटीची हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली.

Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये एक अत्यंत भीषण विमान दुर्घटना घडली आहे. दक्षिण न्यू जर्सीच्या आकाशात दोन हेलिकॉप्टर एकमेकांना धडकल्याने एका पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दुसरा पायलट गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला असून, त्यात एक हेलिकॉप्टर वेगाने जमिनीच्या दिशेने कोसळताना दिसत आहे.
भरवस्तीत आगीचे लोळ आणि घबराट
मिळालेल्या माहितीनुसार, हॅमंटन सिटी एअरपोर्टच्या वर ही दुर्घटना घडली. सकाळी ११:२५ च्या सुमारास दोन एनस्ट्रॉम बनावटीची हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळली. धडक इतकी जोरात होती की, एका हेलिकॉप्टरने पेट घेतला आणि ते थेट जमिनीवर कोसळले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग विझवली. या दोन्ही विमानांत केवळ पायलटच स्वार होते. दुर्घटनेत एकाचा जागीच अंत झाला, तर दुसऱ्या गंभीर जखमी पायलटवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
BREAKING: Helicopter collision reported in Hammonton, New Jersey pic.twitter.com/26jGu4Cnk7
— Intel Point Alert (@IntelPointAlert) December 28, 2025
काय होते अपघाताचे कारण?
अपघाताच्या वेळी हवामान स्वच्छ होते आणि दृश्यता देखील चांगली होती, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. तरीही ही धडक कशी झाली, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, बहुतेक हवाई अपघात हे एकमेकांना पाहण्यात किंवा अंदाज घेण्यात आलेल्या अपयशामुळे होतात. एखाद्या वैमानिकाला 'ब्लाइंड स्पॉट'मुळे दुसरे विमान दिसले नसावे का? या दृष्टीनेही तपास केला जात आहे.
तपासासाठी विशेष पथक तैनात
हॅमंटन पोलीस प्रमुख केविन फ्रियल यांनी सांगितले की, फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन आणि राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्ड या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहेत. दोन्ही पायलटमधील संवाद तपासला जाणार आहे. अपघाताच्या वेळी दोन्ही वैमानिकांना एकमेकांचे विमान दिसत होते का, की तांत्रिक बिघाडामुळे ही धडक झाली, याचा शोध आता घेतला जाईल. न्यू जर्सीच्या या शांत भागात घडलेल्या या घटनेने संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे. विमान उड्डाण नियमांकडे झालेले दुर्लक्ष या अपघाताला कारणीभूत आहे का, हे आता चौकशीनंतरच स्पष्ट होईल.