Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:10 IST2025-10-29T14:09:44+5:302025-10-29T14:10:36+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे जोरदार कौतुक केले आहे.

Video : दक्षिण कोरियात पोहोचले डोनाल्ड ट्रम्प; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले तोंडभरून कौतुक! म्हणाले...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे आणि व्यक्तिमत्त्वाचे जोरदार कौतुक केले आहे. दक्षिण कोरियातील एशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक को-ऑपरेशन शिखर परिषदेपूर्वी एका भाषणात ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना 'नाइस लुकिंग मॅन' म्हटले आहे, ज्यांना पाहून 'आपले वडील असावेत' असे वाटते. मात्र, त्याच वेळी त्यांनी मोदींचा उल्लेख 'किलर' अर्थात कठोर आणि मजबूत नेता असा करत, त्यांच्या कणखर भूमिकेवर शिक्कामोर्तब केला आहे. ट्रम्प यांच्या या खास मैत्रीपूर्ण विधानांनी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर भारत-अमेरिका संबंधांकडे लक्ष वेधले आहे.
भारत-पाक तणावावर ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा
ट्रम्प यांनी आपल्या भाषणात भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचा उल्लेख केला. ते म्हणाले, "तुम्ही भारत आणि पाकिस्तानबद्दल बोलत असाल तर, मी भारतासोबत एक व्यापार करार करत होतो. मला पंतप्रधान मोदींबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. ते दोघे एकमेकांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते."
ट्रम्प यांनी दावा केला की, त्यांनी दोन्ही देशांच्या नेतृत्वाला स्पष्टपणे सांगितले की, जर ते लढत राहिले तर अमेरिका त्यांच्यासोबत कोणताही व्यापार करणार नाही. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या या मध्यस्थीमुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम झाला होता. भारताने मात्र ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या या दाव्याला यापूर्वीच साफ फेटाळले आहे.
मोदींचे केले खास वर्णन
याच वेळी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेबद्दल खास उल्लेख केला. ते म्हणाले, "ते सर्वात चांगले दिसणारे व्यक्ती आहेत, त्यांना पाहून तुम्हाला वाटेल की, जणू ते तुमचे वडील आहेत. पण ते किलर आहेत. एकदा मोदी म्हणाले होते की, 'नाही, आम्ही लढू!' मी विचार केला, 'वोह, हा तोच माणूस आहे का, ज्याला मी ओळखतो?'"
ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना आपला "उत्तम मित्र" असे संबोधले आणि म्हटले की, त्यांची मैत्री खूप मजबूत आहे. ट्रम्प यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात व्यापार आणि ऊर्जा सहकार्यावर भर देताना हे वक्तव्य केले.
Trump: Prime minister Modi is the nicest looking guy. He looks like he would like to have your father -- like, he's a killer. “NO WE WILL FIGHT” pic.twitter.com/OWkepBDOMN
— Acyn (@Acyn) October 29, 2025
व्यापार करारावर चर्चा तीव्र
ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे, जेव्हा भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. ट्रम्प प्रशासनाने भारतीय आयातीवर ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, त्यापैकी २५ टक्के शुल्क ऑगस्टपासून लागू करण्यात आले आहेत.
भारताने आपल्या ऊर्जा धोरणाचे समर्थन करत स्पष्ट केले आहे की, त्यांची तेल खरेदी बाजारातील परिस्थिती आणि राष्ट्रीय सुरक्षा गरजांवर आधारित आहे, कोणत्याही भू-राजकीय दबावावर नाही. आपल्या जनतेसाठी आणि अर्थव्यवस्थेसाठी स्वस्त ऊर्जा आवश्यक आहे, अशी भारताची भूमिका आहे.
ट्रम्प यांच्या भूमिकेत सातत्य
ट्रम्प यांचे हे नवीन विधान त्यांच्या अलीकडील वक्तव्यांशी सुसंगत आहे. याच आठवड्याच्या सुरुवातीला व्हाईट हाऊसमध्ये मीडियाशी बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींना 'ग्रेट पर्सन' आणि 'ग्रेट फ्रेंड' म्हटले होते. दोन्ही नेत्यांमध्ये व्यापार हा चर्चेचा मुख्य विषय होता, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली होती. डोनाल्ड ट्रम्प बुधवारी सोलमध्ये दाखल झाले आहेत, जिथे ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांना भेटणार आहेत.