बांगलादेशच्या हवाई दलाचे F-7 हे लढाऊ विमान ढाक्यातील दियाबारी भागात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. माइलस्टोन कॉलेजच्या कॅम्पसमध्ये असलेल्या शाळेवर हे विमान कोसळलं, ज्यामुळे शाळा आणि आसपासच्या परिसरात गोंधळ उडाला आहे. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला असून ७० जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
सोशल मीडियावर या अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये शाळेतील विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धावताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, F-7 लढाऊ विमानाने दुपारी १:०६ वाजता उड्डाण केलं आणि २४ मिनिटांनी दुपारी १:३० वाजता कोसळलं. हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने घटनेची पुष्टी केली.
एपी वृत्तानुसार, लष्कर आणि अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बांगलादेश हवाई दलाचं एक लढाई विमान ढाकाच्या एका शाळेवर कोसळलं, ज्यामध्ये किमान १९ जणांचा मृत्यू झाला आणि ७० जखमींना उपचारासाठी ६ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताची माहिती मिळताच, बांगलादेश लष्कराचे कर्मचारी आणि अग्निशमन सेवा घटनास्थळी पोहोचल्या आणि बचावकार्य सुरू केलं आहे.
अपघातग्रस्त विमान हे FT-7BGI होतं. ते एक लढाऊ विमान आहे आणि ते चीनी बनावटीचं असल्याचं स्पष्ट झालं आहे. बांगलादेशने आपले हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी चीनकडून FT-7BGI खरेदी केलं होतं. हे विमान चेंगदू एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन चीनने बनवलं आहे. हे विमान F-7 लढाऊ विमानाची सर्वात प्रगत आवृत्ती असल्याचं म्हटलं जातं. बांगलादेशने २०२२ मध्ये चीनकडून ३६ FT-7BGI विमाने खरेदी केली. हे विमान हवाई हल्ल्यांसाठी वापरलं जातं आणि त्याची मर्यादा १७,५०० मीटर आणि ५७,४२० फूट इतकी आहे.