तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 19:49 IST2025-09-12T19:49:13+5:302025-09-12T19:49:58+5:30

हॉटेल असोसिएशन नेपाळने एक निवेदन जारी करून सांगितलं की, या आंदोलनांदरम्यान २० पेक्षा जास्त हॉटेल्सचं मोठं नुकसान झालं.

Vandalism, arson and looting; Nepal's hotel industry suffers huge losses due to Gen Z protests! | तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!

तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!

नेपाळची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर पर्यटनावर अवलंबून आहे आणि यात हॉटेल उद्योगाची महत्त्वाची भूमिका आहे. पण, अलीकडेच झालेल्या आंदोलनांमुळे या क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. या हिंसक निदर्शनांदरम्यान देशभरातील सुमारे दोन डझन हॉटेल्सना लक्ष्य करण्यात आलं, ज्यामुळे २५ अब्ज नेपाळी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. या हिंसेने केवळ मालमत्तेचंच नुकसान झालं नाही, तर हजारो लोकांच्या नोकऱ्यांवरही टांगती तलवार आहे.

हॉटेल उद्योगावर आंदोलनांचा परिणाम!
'माय रिपब्लिका' या नेपाळी न्यूज पोर्टलच्या अहवालानुसार, हॉटेल असोसिएशन नेपाळने एक निवेदन जारी करून सांगितलं की, या आंदोलनांदरम्यान २० पेक्षा जास्त हॉटेल्सचं नुकसान झालं. या हॉटेल्समध्ये तोडफोड, लूट आणि जाळपोळ झाली. यामुळे हॉटेल उद्योगाला २५ अब्ज नेपाळी रुपयांपेक्षा जास्त नुकसान सहन करावं लागलं.

हिल्टन हॉटेलला सर्वाधिक फटका
काठमांडूमधील हिल्टन हॉटेल या हिंसाचारात सर्वाधिक प्रभावित झालं आहे. HANच्या माहितीनुसार, एकट्या या हॉटेलमध्ये ८ अब्ज रुपयांपेक्षा जास्त नुकसान झालं आहे. काठमांडू व्यतिरिक्त पोखरा, बुटवल, भैरहवा, झापा, बिराटनगर, धनगडी, महोत्तरी आणि दांग-तुलसीपूर यांसारख्या शहरांमधील नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हॉटेल्सनाही हिंसाचाराचा फटका बसला.

हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट
या आंदोलनात ज्या हॉटेल्सचं नुकसान झालं आहे, त्यांची दुरुस्ती केल्याशिवाय पुन्हा काम सुरू करणं कठीण आहे. याचा थेट परिणाम या हॉटेल्समध्ये काम करणाऱ्या २०००हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर होणार आहे.

असोसिएशनने पुढे सांगितलं की, या नुकसानीमुळे हॉटेल्सना बँका आणि इतर वित्तीय संस्थांचं कर्ज फेडणं कठीण जाईल. 'हे नुकसान इतकं मोठं आहे की, हॉटेल उद्योगाशी संबंधित लोक त्यांच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकणार नाहीत.' या घटनांची चौकशी करण्यासाठी न्यायिक समिती स्थापन करावी, दोषींना शिक्षा द्यावी आणि प्रभावित व्यवसायांना नुकसानभरपाई जाहीर करावी अशी मागणी असोसिएशनने सरकारकडे केली आहे.

सरकारकडून आर्थिक मदतीची मागणी
हॉटेल असोसिएशन नेपाळने सरकारला हॉटेलची दुरुस्ती करण्यासाठी आणि पुन्हा उभारणीसाठी आर्थिक मदत पॅकेज देण्याची विनंती केली आहे. पर्यटन उद्योगाचा विकास आणि देशाची आर्थिक स्थिरता टिकवण्यासाठी गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा मिळवणं अत्यंत महत्त्वाचं असल्याचं असोसिएशनने सांगितलं. नेपाळच्या जीडीपीमध्ये पर्यटनाचा वाटा सुमारे ७% आहे आणि परकीय चलनाचाही तो एक मोठा स्रोत आहे. कोरोना महामारीनंतर नेपाळचा हॉस्पिटॅलिटी सेक्टर सावरण्याचा प्रयत्न करत होता, पण या आंदोलनांमुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

Web Title: Vandalism, arson and looting; Nepal's hotel industry suffers huge losses due to Gen Z protests!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.