'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 08:43 IST2025-08-25T08:27:11+5:302025-08-25T08:43:28+5:30
रशियातील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी अमेरिकेच्या टॅरिफला चुकीचा निर्णय असल्याचे म्हटलं आहे.

'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
US Tariffs : अमेरिकेने भारतावर अतिरिक्त कर लादल्यापासून रशियातील तेलाचा प्रश्न सध्या जगातील सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा आहे. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५० टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याची घोषणा केली होती. भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे अमेरिकेची ही घोषणा करण्यात आली. रशियाकडून तेल खरेदी करून भारत युक्रेनमधील संघर्षाला चालना देत असल्याचा दावा सातत्याने ट्रम्प प्रशासनाकडून करण्यात येत आहे. अशातचही भारतानेही पु्न्हा एकदा रशियाकडून तेल खरेदी करण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन भारतावर रशियाकडून तेल खरेदी करू नये यासाठी सतत दबाव आणत आहे. मात्र अमेरिकेच्या दबावाला बळी न पडता भारताने आपला निर्णय कायम ठेवला आहे. भारतानेही स्पष्टपणे तेल कुठून खरेदी करायचे हे आमच्या मर्जीवर अवलंबून असल्याचे सांगितले. रशियन वृत्तसंस्थेशी बोलताना, रशियातील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी ही भूमिका मांडली. भारत आपल्या ऊर्जेच्या गरजांसाठी तेल जिथून स्वस्त मिळेल तिथून खरेदी करेल, असं विनय कुमार म्हणाले. भारतीय कंपन्या जिथे कमी दरात मिळेल तिथून तेल खरेदी करत राहिल. रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी अमेरिकेने भारतावर लादलेल्या २५ टक्के शुल्क चुकीचे आहे, असेही विनय कुमार यांनी म्हटलं.
"भारत आपल्या १४० कोटी लोकांच्या हिताची पूर्ण काळजी घेईल. ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या ५० टक्के शुल्कानंतरही सरकार भारतीयांच्या हिताची सेवा करण्यापासून मागे हटणार नाही आणि नेहमीच राष्ट्रीय हिताला प्राधान्य देईल. सगळ्यात आधी आम्ही स्पष्टपणे सांगितले आहे की आमचे उद्दिष्ट भारताच्या १.४ अब्ज लोकांच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करणे आहे. याशिवाय, आम्हाला रशिया आणि इतर अनेक देशांच्या सहकार्याने जागतिक तेल बाजारात स्थिरता आणण्यास मदत करायची आहे. म्हणूनच, रशियन तेल खरेदी केल्याबद्दल अमेरिकेने आमच्यावर लादलेला शुल्क किंवा दंड पूर्णपणे अवास्तव आणि चुकीचा निर्णय आहे. आमचे सरकार देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या हिताचे असे कोणतेही पाऊल उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही," असं विनय कुमार म्हणाले.
"जगातील कोणताही व्यापार हा चांगल्या सौद्यांवर आणि आर्थिक परिस्थितीवर होतो. म्हणून भारतीय तेल कंपन्या जिथे जिथे चांगले सौदे मिळत आहेत तिथून खरेदी करत राहतील. ही सध्याची परिस्थिती आहे. भारत आणि रशियामधील व्यापार परस्पर समंजसपणा आणि दोन्ही बाजूंच्या लोकांच्या समान भावनांवर आधारित आहे. हे दोन्ही देशांच्या हितासाठी आहे," असंही विनय कुमार यांनी म्हटलं.