व्हाईट हाऊस सजले! बायडन यांच्या नातीचा लग्नसोहळा; दिलं होतं अपघातातील मृत मुलीचं नाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 17:17 IST2022-11-14T17:02:08+5:302022-11-14T17:17:41+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांची नात नाओमी बायडन पीटर नीलशी 19 नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहे.

व्हाईट हाऊस सजले! बायडन यांच्या नातीचा लग्नसोहळा; दिलं होतं अपघातातील मृत मुलीचं नाव
अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये लवकरच लग्नसोहळा रंगणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांची नात नाओमी बायडन पीटर नीलशी 19 नोव्हेंबर रोजी लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला. विशेष म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये याआधी 18 लग्न झाली आहे. पण ही पहिलीच वेळ आहे जेव्हा आता असलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या नातीच्या लग्नाचं आयोजन करण्यात आलं आहे. या शाही विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
28 वर्षीय नाओमी बायडन ही राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा मुलगा हंटर बायडन यांची मुलगी आहे. चार वर्षांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये एका मित्राच्या माध्यमातून नाओमीची नीलसोबत ओळख झाली होती. त्यानंतर हे दोघे एकमेकांना डेट करायला लागले आणि आता दोघांनीही लग्न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सध्या नाओमी आणि नील हे दोघेही बायडन यांच्या कुटुंबासह व्हाईट हाऊसमध्येच राहत आहे.
नाओमीची आजी आपल्या लाडक्या नातीच्या लग्नासाठी खूप जास्त उत्सुक आहेत. सर्व बारीकसारीक गोष्टींवर त्या लक्ष ठेवून आहेत. नाओमी बायडन ही वकील आहे. ज्यो बायडन यांनी नाओमीचं नाव हे आपल्या मुलीच्या नावावरून ठेवलं आहे. त्यांच्या मुलीचं अपघातात निधन झालं होतं. नाओमीचं आपल्या आजोबांवर खूप प्रेम असून ती त्यांना प्रेमाने पॉप्स असं म्हणते. युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिलवेनियामध्ये इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये तिने ग्रॅज्युएशन केलं आहे. तसेच कोलंबिया लॉ स्कूलमध्येही शिक्षण घेतलं आहे. आता लग्नामुळे तिची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.