'ओबामांनी काही केलं नाही, तरीही त्यांना नोबेल दिलं, मी तर अनेक...', ट्रम्प स्वतः नोबेलसाठी लॉबिंग करत आहेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 18:50 IST2025-07-09T18:46:31+5:302025-07-09T18:50:52+5:30
इस्रायल आणि पाकिस्तानने नोबेल पुरस्कारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव सुचवलं आहे.

'ओबामांनी काही केलं नाही, तरीही त्यांना नोबेल दिलं, मी तर अनेक...', ट्रम्प स्वतः नोबेलसाठी लॉबिंग करत आहेत
Nobel Prize: इस्रायल आणि पाकिस्तानने नोबेल पुरस्कारासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची मागणी केल्यानंतर या पुरस्काराची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. राष्ट्रांमध्ये बंधुत्व वाढवण्यासाठी, शांतता परिषदांची स्थापना आणि प्रोत्साहन देण्यासाठी सर्वात जास्त किंवा सर्वोत्तम काम करणाऱ्याला हा पुरस्कार देण्यात यावा असं अल्फ्रेड नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात म्हटलं होतं. मात्र नोबेलसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव सुचवले गेल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त करायला सुरुवात केली आहे. कारण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असलेले डोनाल्ड ट्रम्प जगभरात सुरु असलेल्या युद्धांवर भाष्य करताना दिसत आहेत.
आतापर्यंत थिओडोर रुझवेल्ट, वुड्रो विल्सन, जिमी कार्टर आणि बराक ओबामा या चार अमेरिकन राष्ट्रपतींना हा पुरस्कार मिळाला आहे. जर ट्रम्प यांना नोबेल पारितोषिक मिळाले तर ते हा सन्मान मिळवणारे पाचवे अमेरिकन अध्यक्ष असतील. नोबेल पारितोषिकाच्या वेबसाइटनुसार शांतता पुरस्कार मिळालेल्या काही लोकांपैकी काही अत्यंत वादग्रस्त राजकीय कार्यकर्ते होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा यांना राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर काही महिन्यांतच हा पुरस्कार मिळाला. त्यानंतर अनेक चर्चा झाल्या होत्या.
१९९४ मध्ये पॅलेस्टिनी नेते यासर अराफत यांना इस्रायली शिमोन पेरेस आणि यित्झाक राबिन यांच्यासोबत नोबेल शांतता पुरस्कार मिळाला तेव्हा एका सदस्याने राजीनामा दिला. नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करणारी नॉर्वेजियन नोबेल समिती हा पुरस्कार प्रदान करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. यामध्ये नॉर्वेजियन संसदेने नियुक्त केलेल्या पाच व्यक्तींचा समावेश असतो. या समितीचे नेतृत्व सध्या पेन इंटरनॅशनलच्या नॉर्वेजियन शाखेचे प्रमुख करतात.
या पुरस्कारासाठी नामांकन मिळाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प उत्साहित आहेत. त्यांनी या पुरस्कारासाठी नाव सुचवल्याबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचेही कौतुक केले. ट्रम्प यांनी बऱ्याच काळापासून स्वतःला या पुरस्काराचे दावेदार मानले आहे. फेब्रुवारीमध्ये बेंजामिन यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान ट्रम्प यांनी, "ते आम्हाला कधीही नोबेल शांतता पुरस्कार देणार नाहीत, ते खूप चुकीचे आहे, पण मी त्याचा पात्र आहे, पण ते मला देणार नाहीत," असं म्हटलं होतं.
यानंतर जूनमध्ये इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध झाले, या युद्धानंतर इस्रायलने ट्रम्प यांचे नाव नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित केले. ट्रम्प यांना २०१८, २०२० आणि २०२१ मध्ये नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. यानंतर, ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नोबेल पुरस्कारासाठी लॉबिंग सुरू केले आहे. "ओबामा यांना काही आठवड्यातच नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. फक्त काही आठवड्यातच. आम्ही खूप काही केले आहे. आम्ही अनेक वेगवेगळ्या आघाड्यांवर खूप काही केले आहे," असंही ट्रम्प यांनी म्हटलं होतं.