इराणच्या मदतीसाठी रशिया सरसावला; सीआयएच्या संपर्कात असलेल्या प्रमुखाचा खळबळजनक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:33 IST2026-04-01T16:22:28+5:302026-04-01T16:33:42+5:30
रशियाच्या एसव्हीआर या परदेशी गुप्तचर संस्थेचे प्रमुख सर्गेई नरीश्किन यांनी १ एप्रिल रोजी सांगितले की, इराणमधील परिस्थितीसंदर्भात रशियन संस्था अमेरिकेच्या सीआयए या संस्थेशी संपर्कात आहे.

इराणच्या मदतीसाठी रशिया सरसावला; सीआयएच्या संपर्कात असलेल्या प्रमुखाचा खळबळजनक दावा
मागील ३३ दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध समाप्तीबाबत मोठे विधान केले आहे."इराणसोबत युद्ध थांबवण्यासाठी कोणत्याही कराराची गरज नाही आणि हे युद्ध २ ते ३ आठवड्यांत संपू शकते," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दरम्यान, रशियाची गुप्तचर संस्था SVR आणि अमेरिकेची CIA इराणमधील परिस्थितीवर एकमेकांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना होर्मुझ मोहिमेतून माघार घ्यायला लावणारी 'ती' व्यक्ती अखेर कोण आहे?
हे युद्ध आता फक्त रणांगणापुरते मर्यादित राहिलेले नाही. एकीकडे इराणमधील औद्योगिक केंद्रांवर हल्ले सुरू असताना, दुसरीकडे पडद्यामागे जागतिक महासत्तांमध्ये वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. रशियावर इराणला गुप्त माहिती पुरवल्याचा आरोप असतानाच, रशियन गुप्तचर प्रमुखांनी अमेरिकेशी संवाद साधल्याची कबुली दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यापूर्वी इराणला वाटाघाटीसाठी भाग पाडणारे ट्रम्प आता कराराशिवायही युद्ध संपवता येईल असे बोलत आहेत. अमेरिका आणि इस्रायलने इस्फहानमधील औषध कंपन्या आणि पोलाद कारखान्यांना लक्ष्य केले आहे.
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी स्पष्ट केले की, दक्षिण लेबनॉनमधील विस्थापितांना आता कधीच घरी परतू दिले जाणार नाही.
रशिया-CIA कनेक्शन
रशियाचे गुप्तचर प्रमुख सर्गेई नरीश्किन यांनी कबूल केले की, इराणमधील तणाव कमी करण्यासाठी ते अमेरिकेच्या सीआयएच्या संपर्कात आहेत.
पाकिस्तानचे पंतप्रधान आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर, तुर्की आणि इजिप्त 'शटल डिप्लोमसी'द्वारे युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना अजूनही यश आलेले नाही.