मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 19:08 IST2026-04-08T19:07:12+5:302026-04-08T19:08:00+5:30
सोमवारी सकाळी जेव्हा ट्रम्प ईस्टरच्या उत्सवासाठी व्हाईट हाऊसमध्ये लोकांना भेटत होते तेव्हा अतिशय संतप्त झालेले स्टीव्ह विटकॉफ फोनवर होते.

मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांची मुदत दिली होती. या मुदतीपूर्वीच अमेरिकेकडून हल्ले सुरू होते. इस्रायलनेही रेल्वेतून प्रवास करू नका असं आवाहन इराणी नागरिकांना केले होते. आजची रात्र विनाशकारी असेल असं ट्रम्प यांनी म्हटलं होते. मात्र डेडलाइन संपण्याच्या काही तास आधी इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी युद्धविरामच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. एका अमेरिकन वेबसाइटनं युद्धविरामाशी निगडित संपूर्ण घटनाक्रमाचा सविस्तर रिपोर्ट बनवला आहे.
मध्यपूर्वेतील अमेरिकी सैन्य आणि पेंटागॉनचे अधिकारी तणावाच्या शेवटच्या क्षणांमध्ये इराणच्या पायाभूत सुविधांवर मोठा बॉम्बहल्ला करण्याची तयारी करत आहेत. त्यांच्यासाठी ग्रीन सिग्नल कधीही येणार होता परंतु ट्रम्प कोणत्या बाजूने झुकताहेत याचा अंदाजही त्यांना होता. पुढे काय होणार याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. परिस्थिती खूप गोंधळाची होती असं एका संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले. या प्रदेशातील सहकारी देश इराणकडून होणाऱ्या कारवाईला तोंड देण्यासाठी स्वत:ला तयार करत होते. इराणमध्येही नागरी हल्ल्यातून वाचण्यासाठी लोक घर सोडून पळत होते.
सोमवारी सकाळी जेव्हा ट्रम्प ईस्टरच्या उत्सवासाठी व्हाईट हाऊसमध्ये लोकांना भेटत होते तेव्हा अतिशय संतप्त झालेले स्टीव्ह विटकॉफ फोनवर होते. या प्रकरणाची थेट माहिती असलेल्या एका सूत्राने सांगितले की, अमेरिकेच्या राजदूताने इराणकडून अमेरिकेला नुकताच मिळालेला १०-कलमी प्रस्ताव एक आपत्ती आणि महाभयंकर संकट आहे असं सांगितले होते. यामुळे गोंधळ आणि राजनैतिक चर्चेंनी भरलेला दिवस सुरू झाला. पाकिस्तानी मध्यस्थ विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात मसुद्याची देवाणघेवाण करत होते. इजिप्त व तुर्कीचे परराष्ट्र मंत्रीही दोन्ही बाजूंमधील दरी कमी करण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करत होते.
खामेनेई चिठ्ठ्या पाठवून बोलत होते
सोमवार रात्रीपर्यंत मध्यस्थांना दोन आठवड्यांच्या युद्धविरामाच्या सुधारित प्रस्तावाला अमेरिकेची मंजुरी मिळाली होती. आता निर्णय मोजतबा खामेनेई यांच्यावर अवलंबून होता. सूत्रांनुसार ते सोमवार आणि मंगळवारी या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी होते. या चर्चेत इराणच्या नवीन सर्वोच्च नेत्याचा सहभाग हेतुपुरस्सर गुप्त ठेवण्यात आला होता आणि त्यांना सामील करून घेणे हे एक मोठे आव्हानात्मक काम होते. इस्रायलकडून हत्येच्या धोक्याचा सामना करत खामेनेई प्रामुख्याने दूतामार्फत पाठवलेल्या चिठ्ठ्यांद्वारे वाटाघाटी केल्या. खामेनेई यांनीही या प्रस्तावाला मंजुरी दिल्याने मोठं यश मिळाले. वाटाघाटींचे व्यवस्थापन करण्यात आणि रिव्होल्युशनरी गार्डच्या कमांडरांना करार स्वीकारण्यास राजी करण्यात अराघची यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
चीननेही दिला होता सल्ला
चीनदेखील इराणला या पेचप्रसंगातून मार्ग काढण्याचा सल्ला देत होता. परंतु अखेरीस सोमवार आणि मंगळवारी घेतलेले सर्व मोठे निर्णय खामेनेई यांच्या मंजुरीनेच घेण्यात आले. त्यांच्या मंजुरीशिवाय हा करार शक्य झाला नसता असं सूत्रांनी सांगितले. मंगळवार सकाळपर्यंत चर्चेत काही प्रगती होत असल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु ट्रम्प यांच्या संस्कृतीचा अंत करण्याच्या धमकीमुळे हा करार मागे पडणार होता. प्रत्युत्तर म्हणून इराण चर्चा थांबवत आहे अशा बातम्या झळकल्या. मात्र चर्चेत सहभागी असलेल्या सूत्रांनी तसे काहीही नव्हते, उलट चर्चेला किंचित गतीच मिळाली होती असा दावा केला.
अमेरिकेच्या वेळेनुसार मंगळवारी दुपारच्या सुमारास दोन्ही देश २ आठवड्यांच्या युद्धविरामावर सहमत असल्याचं स्पष्ट झाले. तीन तासांनंतर पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 'X' वरील अटी जाहीर केल्या आणि दोन्ही बाजूंना त्या स्वीकारण्याचे आवाहन केले. ट्रम्प यांना लगेचच त्यांच्या कट्टरपंथी मित्रांकडून आणि विश्वासू सहकाऱ्यांकडून फोन आणि टेक्स्ट मेसेज येऊ लागले, ज्यात त्यांना हा प्रस्ताव नाकारण्याचा आग्रह केला जात होता. ट्रम्प यांच्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांमध्येही इतका संभ्रम होता की, जे लोक फक्त एक-दोन तासांपूर्वी ट्रम्प यांच्याशी बोलले होते त्यांनीही ते शस्त्रसंधीचा प्रस्ताव नाकारतील असे गृहीत धरले होते आणि अखेरीस त्यांनी तो प्रस्ताव स्वीकारेपर्यंत हाच समज कायम होता.
ट्रम्प यांना मुनीर यांना कॉल
डोनाल्ड ट्रम्प यांनी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर डील पक्की करण्यासाठी पाकिस्तानी फिल्ड मार्शल असीम मुनीर यांना कॉल केला. त्यानंतर १५ मिनिटांनी अमेरिकन सैन्याला मिशनवरून मागे हटण्याचे आदेश मिळाले. आता इस्लामाबाद येथे इराण आणि अमेरिका यांच्यातील शिष्टमंडळात पुढील चर्चा होणार आहे.