आधी 3, आणि आता 6; युद्ध थांबवण्यासाठी इराणने अमेरिकेपुढे ठेवल्या ६ अटी, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 13:31 IST2026-03-23T13:30:06+5:302026-03-23T13:31:16+5:30
US-Israel-Iran Crisis: तात्काळ युद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत...

आधी 3, आणि आता 6; युद्ध थांबवण्यासाठी इराणने अमेरिकेपुढे ठेवल्या ६ अटी, जाणून घ्या...
US-Israel-Iran Crisis: अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाl तात्काळ युद्धविराम होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या पार्श्वभूमीवर इराणने युद्ध संपवण्यासाठी सहा अटी जाहीर केल्या असून, या अटी फक्त युद्धविरामापुरत्या मर्यादित नसून संपूर्ण मध्यपूर्वेतील राजकीय-लष्करी समीकरण बदलण्याचा संकेत देतात.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लेबनानी माध्यम अल मायादीनला दिलेल्या मुलाखतीत या अटी जाहीर केल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही प्रतिक्रिया नसून अनेक महिन्यांपूर्वी तयार केलेल्या रणनीतीचा भाग आहे.
होर्मुज सामुद्रधुनीवरून तणाव वाढला
युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) खुली करण्यासाठी 48 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. त्यांनी इशारा दिला की, जर सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणच्या वीज वितरण यंत्रणेवर हल्ले केले जातील. याला प्रत्युत्तर देताना इराणने धमकी दिली की, होर्मुज सामुद्रधुनीवर अमेरिकेने काही कारवाई केली, तर आम्ही गल्फ देशांच्या वीज वितरण यंत्रणेवर आणि अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले करू. यामुळेच आता हा तणाव कमी होण्याऐवजी आणखी वाढताना दिसतोय.
युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या 6 अटी
- युद्ध पुन्हा होणार नाही याची हमी, तात्पुरता किंवा प्रतीकात्मक युद्धविराम मान्य नाही.
- अमेरिकेचे सर्व लष्करी तळ मध्यपूर्वेतून हटवणे आणि पश्चिम आशियातील अमेरिकेची लष्करी उपस्थिती कमी करणे.
- युद्धामुळे झालेल्या सर्व नुकसानीसाठी आर्थिक भरपाई.
- सर्व प्रादेशिक युद्धांचा शेवट.
- होर्मुज सामुद्रधुनीसाठी नवीन कायदेशीर व्यवस्था आणि जागतिक ऊर्जा मार्गावर इराणचा प्रभाव सुनिश्चित करणे.
- इराणविरोधी प्रचार करणाऱ्या माध्यमांतील संबंधित व्यक्तींवर कारवाई व प्रत्यर्पण.
विश्लेषकांच्या मते, या अटींवरून इराण आता युद्धविरामासाठी नव्हे, तर स्वतःच्या अटींवर नवा प्रादेशिक करार करण्याच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे.
इराणची आधीपासून आखलेली रणनीती
इराणी अधिकाऱ्याने सांगितले की, इराणने सुरुवातीच्या मोठ्या प्रमाणातील क्षेपणास्त्र हल्ल्यांऐवजी आता अचूक लक्ष्यांवर हल्ले करण्याची रणनीती अवलंबली आहे. शत्रूची हवाई संरक्षण व्यवस्था नष्ट करण्यात आली आहे. काही भागात आकाशावर नियंत्रण मिळवले असल्याचा दावा इराणने केला आहे. इराणचे म्हणणे आहे की, पूर्ण युद्धविरामाची हमी मिळेपर्यंत हल्ले थांबणार नाहीत.
तात्काळ युद्धविरामाची शक्यता कमी
इराणी अधिकाऱ्यांच्या मते, सध्याच्या लष्करी परिस्थितीचा विचार करता तत्काळ युद्धविराम होण्याची शक्यता फार कमी आहे. तेहरानची सध्याची रणनीती म्हणजे हल्लेखोरांना शिक्षा देणे आणि इस्त्रायल-अमेरिकेला धडा शिकवणे, अशी भूमिका त्यांनी मांडली. इराणने स्पष्ट संदेश दिला की, भविष्यातील कोणताही युद्धविराम हा जुन्या परिस्थितीकडे परत जाणार नाही, तर युद्धातील परिस्थितीनुसार मध्यपूर्वेतील नवीन राजकीय-लष्करी समीकरण तयार होईल.