अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:39 IST2026-04-08T10:39:02+5:302026-04-08T10:39:51+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या डेडलाईननंतर अवघ्या काही तासांतच ही शांततेची बातमी आली आहे.

US-Iran truce finally! Trump toughened up, did Pakistan mediate or did China? Read what happened... | अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...

अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...

गेल्या काही दिवसांपासून जगाचा श्वास रोखून धरायला लावणाऱ्या अमेरिका आणि इराण युद्धाला अखेर 'अल्पविराम' मिळाला आहे. २८ फेब्रुवारीला सुरू झालेल्या या महाभयंकर संघर्षात दोन्ही देशांनी दोन आठवड्यांच्या सीजफायर सहमती दर्शवली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या डेडलाईननंतर अवघ्या काही तासांतच ही शांततेची बातमी आली आहे. मात्र, या तहामागे नेमका हात कोणाचा? पाकिस्तान की चीन? याबाबत आता जागतिक स्तरावर चर्चांना उधाण आले आहे.

ट्रम्प यांचा यू-टर्न आणि 'ट्रुथ सोशल'वरील धमाका

काही तासांपूर्वी इराणमध्ये वादळ आणण्याची धमकी देणारे आणि इराणची सभ्यता पुसून टाकण्याची भाषा करणारे डोनाल्ड ट्रम्प अचानक मवाळ झालेले पाहायला मिळाले. ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर माहिती दिली की, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर, मी दोन आठवड्यांसाठी इराणवरील हल्ले स्थगित करण्यास तयार झालो आहे. पाकिस्तानने केलेल्या विनंतीचा मान राखून हा निर्णय घेतल्याचे ट्रम्प यांनी म्हटले असले, तरी यात चीनची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे त्यांनी मान्य केले आहे.

इराणचा १० कलमी प्लॅन: काय आहेत अटी?

इराणने हा युद्धविराम मान्य करण्यासाठी अमेरिकेसमोर १० अटींचा डोंगर उभा केला होता. यात प्रामुख्याने अमेरिकेने हल्ले थांबवणे, होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण राहणे, युरेनियम समृद्धीकरणास परवानगी देणे, इराणवरील सर्व निर्बंध हटवणे आणि जप्त केलेली मालमत्ता परत करणे अशा कडक अटींचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ट्रम्प यांनी या अटींना चर्चेचा सकारात्मक आधार मानले असून, पुढील दोन आठवड्यांत यावर अंतिम तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

इस्रायलचा खेळ अजूनही सुरूच?

एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये सीजफायरची चर्चा सुरू असताना इस्रायल मात्र मागे हटायला तयार नाही. व्हाईट हाऊसने दावा केला आहे की इस्रायल या प्रक्रियेचा भाग आहे, परंतु जमिनीवरची परिस्थिती वेगळी आहे. 'द टाइम्स ऑफ इस्रायल'च्या वृत्तानुसार, युद्धविरामाची घोषणा होऊनही इस्रायली हवाई दलाचे इराणमधील लष्करी तळांवर हल्ले सुरूच आहेत. यामुळे हा सीजफायर खरोखर टिकणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पाकिस्तानच्या पोस्टमुळे फजिती

या संपूर्ण वादात पाकिस्तानने मध्यस्थ म्हणून आपली प्रतिमा चमकवण्याचा प्रयत्न केला, पण एका चुकीमुळे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची मोठी फजिती झाली. शरीफ यांनी ट्रम्प यांच्याशी झालेल्या संवादाची जी पोस्ट एक्सवर शेअर केली, ती एखाद्या ड्राफ्टसारखी वाटत होती. त्यात चक्क 'Draft Pakistans PM Message on X' असे लिहिले होते, ज्यामुळे पाकिस्तान केवळ कोणाची तरी स्क्रिप्ट वाचत आहे की काय, अशी शंका नेटकऱ्यांनी उपस्थित केली आहे.

पुढील पाऊल काय?

आता येत्या १० एप्रिल रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी आमनेसामने बसणार आहेत. या बैठकीत होर्मुजची सामुद्रधुनी व्यापारी जहाजांसाठी पूर्णपणे खुली करण्यावर आणि इराणच्या १० अटींवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. जर ही चर्चा यशस्वी झाली, तर मध्य-पूर्वेतील युद्धाचे ढग काही काळासाठी का होईना, विरघळतील.

Web Title: US-Iran truce finally! Trump toughened up, did Pakistan mediate or did China? Read what happened...