डोनाल्ड ट्रम्प यांची इराणसोबत अणु करार करण्याची इच्छा; खामेनी यांना पाठवले पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:52 IST2025-03-07T19:50:53+5:302025-03-07T19:52:12+5:30
US-Iran Nuclear Deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांची इराणसोबत अणु करार करण्याची इच्छा; खामेनी यांना पाठवले पत्र
US Nuclear Deal With Iran: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. टॅरिफ वाढवणे असो, स्थलांतरीतांचा मुद्दा असो अथवा रशिया-युक्रेनचा मुद्दा असो...त्यांच्या निर्णयांचा जगावर परिणाम होताना दिसतोय. अशातच आता ट्रम्प आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी अणु करार करण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्यासाठी इराणच्या प्रमुखाला पत्रही पाठवले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (07 मार्च 2025) फॉक्स बिझनेस नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, त्यांनी इराणच्या प्रमुखांना पत्र लिहून अनु करार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच, यासाठी इराण तयार होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. ट्रम्प पुढे म्हणाले, इराणशी व्यवहार करण्याचे दोन मार्ग आहेत, एक लष्करी किंवा तडजोड. मी तडजोड करण्यास प्राधान्य देईन, कारण मला इराणला दुखवायचे नाही. अद्याप यावर इराणकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
रशियाचा अमेरिकेला पाठिंबा?
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, रशियाचे उप परराष्ट्र मंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी इराणचे राजदूत काझेम जलाली यांच्याशी इराणच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित परिस्थितीचे निराकरण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांवर चर्चा केली. ट्रम्प यांनी जानेवारीत पदभार स्वीकारल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणात मोठे बदल केले आहेत. रशियाबद्दल अमेरिकेचा दृष्टिकोन बदलला आहे आणि अधिक सामंजस्यपूर्ण भूमिका स्वीकारली गेली आहे. इतर पाश्चात्य मित्र राष्ट्रांना याची चिंता आहे. रशिया आणि युक्रेनमधील तीन वर्षांपासून सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठीही ट्रम्प प्रयत्नशील आहेत.