अमेरिका-इराण संघर्ष आता डिजिटल युद्धाच्या दिशेने; संपूर्ण मध्य-पूर्वेमध्ये ‘डिजिटल ब्लॅकआउट’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 08:03 IST2026-04-26T08:01:20+5:302026-04-26T08:03:03+5:30
इराण-अमेरिका संघर्ष आता तेलावरील वादातून माहिती आणि कनेक्टिव्हिटीवरील लढ्यात परिवर्तित झाला आहे. डिजिटल युगाचे साम्राज्य उभे करणाऱ्या अमेरिकेलाच इराणकडून खो बसतो आहे. होर्मुझची सामुद्रधुनी, जी एकेकाळी प्रामुख्याने ऊर्जा सुरक्षेचे प्रतीक होती, ती आता भौतिक आणि डिजिटल अशा दुहेरी रणनीतीचे केंद्र बनली असून संपूर्ण जगालाच तिने डिजिटल युद्धाच्या कक्षेत ओढले आहे.

अमेरिका-इराण संघर्ष आता डिजिटल युद्धाच्या दिशेने; संपूर्ण मध्य-पूर्वेमध्ये ‘डिजिटल ब्लॅकआउट’?
डॉ. सुखदेव उंदरे
आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर केंद्रित असलेला इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष एका नवीन आणि संभाव्यतः अधिक धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. जगातील सर्वात महत्त्वाच्या तेल-पुरवठा मार्गांपैकी एकावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू झालेला पारंपरिक लष्करी आणि आर्थिक संघर्ष आता एका हायब्रीड वॉरफेअर (संकरित युद्ध) मध्ये रूपांतरित होतो आहे. जिथे ‘सायबर क्षमता’ आणि ‘डिजिटल पायाभूत सुविधा’ ही प्रमुख युद्धभूमी म्हणून उदयास येत आहेत.
हा संघर्ष पारंपरिक युद्धापुरता मर्यादित न राहता तो डिजिटल जगालाही आपल्या कवेत घेतो आहे. कालपर्यंत डोनाल्ड ट्रम्प इराणचे नेतृत्व संपवल्याचे सांगत होते, आज मात्र इराणचे नेतृत्व विभागले गेल्याचे सांगत आहेत. युद्धविराम संपायला अवघे काही तास उरले असतानाच, ट्रम्प यांनी हा संघर्ष अनिश्चित काळासाठी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कारण इराणने अमेरिकेसमोर डिजिटल व सायबर युद्धाचे मोठे आव्हान उभे केले आहे. नुकतेच, इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड्सने ॲपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि स्टारलिंक यांसारख्या १८ प्रमुख अमेरिकन टेक कंपन्यांच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी दिली आहे, ज्यामुळे संपूर्ण मध्य-पूर्वेमध्ये ‘डिजिटल ब्लॅकआउट’ आणि इंटरनेटच्या वहनामध्ये व्यत्यय येण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.
इराण-अमेरिका संघर्ष आता तेलावरील वादातून माहिती आणि कनेक्टिव्हिटीवरील लढ्यात परिवर्तित झाला आहे. डिजिटल युगाचे साम्राज्य उभे करणाऱ्या अमेरिकेलाच इराणकडून खो बसतो आहे. होर्मुझची सामुद्रधुनी, जी एकेकाळी प्रामुख्याने ऊर्जा सुरक्षेचे प्रतीक होती, ती आता भौतिक आणि डिजिटल अशा दुहेरी रणनीतीचे केंद्र बनली असून संपूर्ण जगालाच तिने डिजिटल युद्धाच्या कक्षेत ओढले आहे.
इराणने टेक कंपन्यांवर फिजिकल अटॅकची तयारी केली आहे. ‘ऑपरेशन १८’ द्वारे १८ कंपन्यांना डिजिटल लक्ष्य केले आहे. याद्वारे डिजिटल हेरगिरीला थोपविण्याचा इराणचा प्रयत्न आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड कॉम्प्युटिंग्य, सर्विलांस टेक्नॉलॉजी, टार्गेट ट्रेकिंग, सॅटेलाईटद्वारा लोकेशनची मॅपिंग, सिग्नल इंटेलिजन्स इलेक्ट्रोनिक जॅमिंग आणि शेवटी टार्गेट लॉक... ही पूर्ण इलेक्ट्रोनिक वॉरफेअरची प्रक्रिया आहे, आणि यात इराणने स्वतःला कुशल केलेले आहे.
सायबर युद्धाचा उदय आणि इराणची तयारी
युद्धाच्या सुरुवातीच्या टप्प्यात हवाई हल्ले, नौदल संघर्ष आणि तेल पुरवठ्यात व्यत्यय आणण्यावर लक्ष केंद्रित केले जात असले तरी, आता सायबर युद्धाचे नवे रूप अधिकाधिक समोर येत आहे. सुरुवातीपासूनच, लष्करी हल्ल्यांना पाठिंबा देण्यासाठी सायबर कारवायांचा वापर केला जात होता, ज्यात इराणच्या कमांड-अँड-कंट्रोल प्रणालींमध्ये व्यत्यय आणण्याचाही समावेश होता. इराणकडे दीर्घकाळापासून सायबर क्षमता आहे, ज्यात डिस्ट्रिब्युटेड डिनायल-ऑफ-सर्व्हिस हल्ले, हेरगिरी आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचा अनुभव समाविष्ट आहे. सध्याच्या संघर्षादरम्यान, शासन-समर्थित घटक आणि प्रॉक्सी हॅक्टिव्हिस्ट गट या दोघांनीही अमेरिका आणि मित्र राष्ट्रांच्या प्रणालींवर हल्ले केले आहेत, आणि आता जागतिक डिजिटल पायाभूत सुविधांना विशेषतः समुद्राखालील केबल्सना लक्ष्य करण्याचा धोका आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार, इराणशी संबंधित शक्तींनी अमेरिका आणि इस्रायलवर हजारो सायबर हल्ले केले आहेत, ज्यात या प्रदेशातील डेटा सेंटर्स आणि नेटवर्क्सना लक्ष्य केले आहे.