पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 12:38 IST2026-04-11T12:36:02+5:302026-04-11T12:38:12+5:30
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स हे देखील शांतता चर्चेत अमेरिकेच्या बाजूचे नेतृत्व करण्यासाठी इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत.

पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
वॉश्गिंटन - पाकिस्तानमध्येइराणसोबतची शांतता चर्चा अयशस्वी झाल्यास अमेरिकेकडे कोणताही पर्यायी प्लॅन नाही. आज इस्लामाबादमध्ये दोन्ही बाजूंचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ भेटत असतानाच अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी ट्रम्प यांना विचारण्यात आले की, जर अमेरिका इराण यांच्यातील चर्चा अयशस्वी ठरली आणि इराणने स्ट्रेट होर्मुझ खुला करण्यास नकार दिला तर अमेरिकेकडे अन्य कुठला पर्यायी प्लॅन आहे का? या प्रश्नावर ट्रम्प यांनी बॅकअप प्लॅनची काही गरज नाही. त्यांच्या सैन्याचा पराभव झाला आहे. त्यांच्याकडे खूप कमी क्षेपणास्त्रे आहेत आणि उत्पादन क्षमताही मर्यादित आहे. आम्ही इराणला जबरदस्त धक्का दिला आहे. आमचे सैन्य जे काम करतंय ते कौतुकास्पद आहे असं उत्तर दिले.
तर शांतता चर्चेतच अमेरिकेने मध्य पूर्वेत अधिक सैन्य तैनात केले आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या संघर्षात २ आठवड्यांसाठी करण्यात आलेल्या युद्धबंदीमुळे आखाती प्रदेशात शांततेचा दुर्मिळ क्षण आला आहे. दुसरीकडे इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांच्या नेतृत्वाखालील आणि परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांचा समावेश असलेले इराणी शिष्टमंडळ आज सकाळी इस्लामाबादमध्ये दाखल झाले असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. पाकिस्तानी मंत्री इशाक दार आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी त्यांचे स्वागत केले.
जे.डी. व्हान्स यांचंही पाकिस्तानात आगमन
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स हे देखील शांतता चर्चेत अमेरिकेच्या बाजूचे नेतृत्व करण्यासाठी इस्लामाबादमध्ये दाखल झाले आहेत. पॅरिसहून निघण्यापूर्वी, त्यांनी तेहरानला वॉशिंग्टनशी पंगा न घेण्याचा इशारा दिला होता. जर त्यांनी आमच्याशी पंगा घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना वाटाघाटी करणारा संघ इतका सहकार्य करणार नाही हे कळेल असा टोलाही लगावला आहे.
यापूर्वी चर्चेच्या अटींवर काय मतभेद होते?
दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात यापूर्वी चर्चेच्या अटींवर मतभेद होते. ट्रम्प प्रशासनाने १५-कलमी आराखडा तयार केला होता ज्यानुसार इराणने समृद्ध युरेनियमचा साठा सोडणे आणि आपल्या लष्करी सामर्थ्यावर मर्यादा स्वीकाराव्यात अशी मागणी करण्यात आली होती. दुसरीकडे इराणने आपली स्वतःची १०-कलमी योजना सादर केली, ज्यात नुकसान भरपाईची मागणी करत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील तेहरानचे सार्वभौमत्व मान्य करण्याचे आवाहन केले होते.