इराणच्या अणु कार्यक्रमावरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत गुरुवारी चांगलाच वाद पेटला. अमेरिका आणि पाश्चात्य देश रशिया आणि चीनशी थेट भिडले. इराणविरोधात अमेरिकेने कठोर पाऊले आणि निर्बंध लादणे कसे योग्य होते हे सांगण्याचा प्रयत्न केला तर रशिया आणि चीनने अमेरिकेवर जागतिक संकट भडकवण्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने २ आठवड्यापूर्वी इराणविरोधात युद्ध सुरू केले. हे युद्ध कसे योग्य आहे याबाबत संयुक्त राष्ट्रात अमेरिकेने त्यांचे तर्क मांडले. त्यावेळी परिषदेच्या बैठकीत हा वाद उफाळून आला.
१५ सदस्यीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत रशिया आणि चीनने इराणवरील संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांवर लक्ष ठेवणाऱ्या १७३७ समितीशी संबंधित चर्चा रोखण्याचा प्रयत्न केला. तरीही परिषदेत झालेल्या मतदानात रशिया आणि चीनचे प्रयत्न अयशस्वी ठरले. ११ देशांनी चर्चा सुरू ठेवण्याच्या बाजूने मतदान केले तर २ देशांनी मतदानावेळी तटस्थ राहण्याची भूमिका निभावली. रशिया आणि चीन इराणला वाचवण्याचा प्रयत्न करताहेत असा आरोप संयुक्त राष्ट्रात अमेरिकन राजदूत माइक वॉल्टज यांनी केला. सर्व देशांनी इराणवर शस्त्रास्त्र बंदी घालायला हवी अशी मागणी अमेरिकेने केली.
सर्व संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांनी इराणवर शस्त्रास्त्र निर्बंध लादावेत. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या हस्तांतरण आणि व्यापारावर बंदी घालावी. त्याशिवाय संबंधित आर्थिक संसाधने गोठवावीत असं अमेरिकन राजदूताने बैठकीत म्हटलं. हे निर्बंध इराणच्या अणु, क्षेपणास्त्र आणि पारंपारिक शस्त्रास्त्र कार्यक्रमांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याला रोखण्यासाठी आहेत असाही उल्लेख अमेरिकेने केला. मात्र चीनने हे आरोप फेटाळून लावले. जागतिक संकटासाठी चीनने अमेरिकेला जबाबदार धरले. अमेरिकाच इराणमधील अणु संकटाला भडकवणारा मुख्य आहे. वाटाघाटीत त्यांनी इराणविरुद्ध उघडपणे बळाचा वापर केला ज्यामुळे राजनैतिक प्रयत्न निष्फळ ठरले असं संयुक्त राष्ट्रांमधील चीनचे प्रतिनिधी फू काँग यांनी आरोप केला.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांमधील इराणचे राजदूत अमीर सईद इरावनी यांनीही आपल्या देशाच्या अणु कार्यक्रमाचे समर्थन केले. इराणचा अणु कार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण आहे आणि आम्ही आमच्याविरुद्ध कोणतेही नवीन निर्बंध स्वीकारणार नाही असं इरावनी यांनी स्पष्ट सांगितले.
Web Summary : At the UN, Russia and China clashed with the US over Iran's nuclear program. The US sought stricter measures, while Russia and China blamed America for escalating global tensions and defended Iran's peaceful nuclear intentions.
Web Summary : ईरान के परमाणु कार्यक्रम पर UN में अमेरिका और रूस-चीन भिड़े. अमेरिका ने प्रतिबंधों की वकालत की, जबकि रूस-चीन ने अमेरिका पर वैश्विक तनाव बढ़ाने का आरोप लगाया और ईरान के शांतिपूर्ण परमाणु इरादों का समर्थन किया.