अमेरिकेच्या 'एअर फोर्स वन'ची सुरक्षा भेदली! डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाच्या प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी; F-16 लढाऊ विमानांची झेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 09:25 IST2026-03-30T09:24:15+5:302026-03-30T09:25:48+5:30
Donald Trump Air Force One Security Lapse : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'एअर फोर्स वन' विमानाची सुरक्षा भेदली गेली. फ्लोरिडामध्ये उड्डाण निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्या नागरी विमानाला F-16 लढाऊ विमानांनी रोखले.

अमेरिकेच्या 'एअर फोर्स वन'ची सुरक्षा भेदली! डोनाल्ड ट्रम्प यांच्या विमानाच्या प्रतिबंधित क्षेत्रात घुसखोरी; F-16 लढाऊ विमानांची झेप
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेत रविवारी मोठी चूक झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. फ्लोरिडा येथील पाम बीच आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका नागरी विमानाने राष्ट्राध्यक्षांच्या अधिकृत 'एअर फोर्स वन' विमानासाठी लागू असलेल्या उड्डाण निर्बंधांचे उल्लंघन केले. या घटनेमुळे सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, परिस्थिती हाताळण्यासाठी तातडीने F-16 लढाऊ विमानांना पाचारण करावे लागले.
'न्यूयॉर्क पोस्ट'च्या वृत्तानुसार, जेव्हा हे नागरी विमान प्रतिबंधित क्षेत्रात शिरले, तेव्हा हवाई नियंत्रण कक्षाचा त्याच्याशी संपर्क तुटला होता. नॉर्थ अमेरिकन एरोस्पेस डिफेन्स कमांडच्या आदेशानुसार, दोन F-16 लढाऊ विमानांनी तातडीने झेप घेऊन या विमानाला पाम बीचच्या आकाशात रोखले. लढाऊ विमानांच्या वैमानिकांनी नागरी विमानाला संकेत देण्यासाठी 'फ्लेअर्स'चा वापर केला आणि त्याला सुरक्षितपणे प्रतिबंधित क्षेत्राबाहेर काढले.
राष्ट्राध्यक्षांना धोका नव्हता - व्हाईट हाऊस
या घटनेनंतर पाम बीच विमानतळावरील विमानांची ये-जा काही काळ थांबवण्यात आली होती. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, या संपूर्ण घटनेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किंवा त्यांच्या 'एअर फोर्स वन' विमानाला कोणताही प्रत्यक्ष धोका नव्हता. नागरी विमानाशी संपर्क पुन्हा प्रस्थापित झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आणि कोणताही घातपाती प्रकार नसल्याचे समोर आले.
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या सर्वोच्च नेत्याच्या सुरक्षेत झालेली ही चूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.