ड्रग्जने भरलेल्या पाणबुडीवर अमेरिकेचा हल्ला; ट्रम्प म्हणाले,'२५ हजार अमेरिकन लोकांना मरण्यापासून वाचवले'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 16:01 IST2025-10-19T15:56:59+5:302025-10-19T16:01:12+5:30
अमेरिकेने सिंथेटिक ड्रग्ज घेऊन जाणाऱ्या एका पाणबुडीवर हल्ला करुन ती नष्ट केली.

ड्रग्जने भरलेल्या पाणबुडीवर अमेरिकेचा हल्ला; ट्रम्प म्हणाले,'२५ हजार अमेरिकन लोकांना मरण्यापासून वाचवले'
Trump on Drug Carrying Submarine: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी अमेरिकेने अंमली पदार्थ घेऊन येणाऱ्या एका सबमरीनवर हल्ला करून ती नष्ट केल्याची माहिती दिली आहे. कॅरिबियन तटावरून अमेरिकेच्या दिशेने येणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीचा ही सबमरीन एक भाग होती. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, जर या पाणबुडीमधील अंमली पदार्थ अमेरिकेत पोहोचले असते, तर त्यामुळे सुमारे २५,००० अमेरिकी नागरिकांचा बळी गेला असता. ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून या कारवाईची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, हा हल्ला गुरुवारी १६ ऑक्टोबर रोजी करण्यात आला. सबमरीनमध्ये फेंटानिल आणि इतर बेकायदेशीर मादक पदार्थांचा मोठा साठा भरलेला होता.
ट्रम्प यांच्या पोस्टनुसार, स्ट्राइकच्या वेळी सबमरीनमध्ये चार अंमली पदार्थ तस्कर होते. त्यापैकी दोन जणांचा हल्ल्यात मृत्यू झाला, तर दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. वाचवलेले तस्कर इक्वाडोर आणि कोलंबियाचे रहिवासी आहेत. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या मूळ देशात पाठवले आले, जिथे त्यांच्यावर कायद्यानुसार खटला चालवला जाईल. या कारवाईत अमेरिकी दलाचे कोणतेही नुकसान झाले नाही. एका खूप मोठ्या अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या सबमरीनला नष्ट करणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांनी उल्लेख केलेले फेंटानिल हे एक शक्तिशाली पेन किलर आहे, जे गंभीर आणि जुन्या दुखण्यांवर उपचार करण्यासाठी वापरले जाते. मात्र, हे औषध नसून एक केमिकल आहे. हे हरोईनपेक्षा ५० पट आणि मॉर्फिनपेक्षा १०० पट अधिक शक्तिशाली असते. यामुळेच या सिंथेटिक पदार्थाचे अवैध उत्पादन आणि तस्करी मोठ्या प्रमाणात होते. अमेरिकेत २०१६ पासून अंमली पदार्थांच्या व्यसनाचा आणि मृत्यूचा हा एक प्रमुख कारण बनले आहे, आणि २०२२ मध्ये यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी त्यांच्या नागरिकाच्या परत येण्याची पुष्टी केली आहे. कोलंबियात परतल्यानंतर त्याच्यावर देशाच्या कायद्यानुसार खटला चालवला जाईल. दुसरीकडे, इक्वाडोरच्या सरकारी प्रेस ऑफिसने सध्या त्यांच्या नागरिकाच्या परत येण्याबाबत माहिती नसल्याचे सांगितले. ही संपूर्ण कारवाई अमेरिकेने अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध उचललेले एक महत्त्वाचे आणि मोठे पाऊल मानले जात आहे.