व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2025 18:05 IST2025-05-25T18:04:41+5:302025-05-25T18:05:52+5:30
Vladimir Putin: रशियातील कुर्स्क भागातून पुतीन यांचं हेलिकॉप्टर जात असताना युक्रेनकडून या ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त
रशिया आणि युक्रेनमध्ये सुमारे सव्वातीन वर्षांपासून सुरू असलेलं युद्ध अद्याप संपण्याचं नाव घेत नाही आहे. त्यात आज रशियाने युक्रेनमधील अनेक भागांवर शेकडो ड्रोनच्या मदतीने मोठा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच युक्रेननेही रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने त्यांच्या हेलिकॉप्टरवर ड्रोन हल्ला केल्याचं समोर आलं आहे. मात्र रशियन सैन्याने वेळीच सतर्क होत हे ड्रोन नष्ट केल्याने मोठी दुर्घटना टळली, रशियातील कुर्स्क भागातून पुतीन यांचं हेलिकॉप्टर जात असताना युक्रेनकडून या ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न झाला. घटनेमुळे जगभरात खळबळ उडाली आहे.
रशियाच्या हवाई संरक्षण प्रणाली पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत हे ड्रोन पुतीन यांच्या उड्डाण मार्गात येण्यापूर्वीच नष्ट केले. या घटनेत कुणाला दुखापत झाल्याचं किंवा राष्ट्रपतींच्या ताफ्यातील कुणाला काही नुकसान झाल्याची माहिती नाही. आता रशियाच्या सुरक्षा यंत्रणांकडून या घटनेची पूर्ण चौकशी केली जात आहे. तसेच युक्रेनचं ड्रोन कुर्स्कसाख्या संवेदनशील भागात कसं काय पोहोचलं याचा शोध घेतला जात आहे. त्याबरोबरच हा हल्ला रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांना लक्ष्य करून करण्यात आला होता की, केवळ दबावतंत्राचा भाग होता याचाही शोध घेतला जात आहे. मात्र याबाबत युक्रेन सरकार आणि सैन्यदलाकडून कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
याबाबत रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचं हेलिकॉप्टर कुर्स्क भागातून ज्या मार्गावरून जात होतं, त्या मार्गाला युक्रेनने ड्रोनच्या माध्यमातून लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. जे मात्र या हल्ल्याचा प्रयत्न रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने उधळून लावला.
दरम्यान, रशियाने आज पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ला केला होता. हा हल्ला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे मानण्यात येत आहे. रशियाने युक्रेनवर ३६७ ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या हल्ल्यात किमान १३ जणांचा मृत्यू झाला आहे, यात तीन मुलांचा समावेश आहे. तर बारा जण जखमी झाले आहेत. युक्रेनच्या हवाई दलाने २६६ रशियन ड्रोन आणि ४५ क्षेपणास्त्रे पाडल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यात अपार्टमेंट आणि इमारतींचे नुकसान झाले आहे.