२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:48 IST2025-12-20T12:48:06+5:302025-12-20T12:48:54+5:30
या नेटवर्कच्या माध्यमातून रशिया कच्चे तेल विकून युक्रेन युद्धात पैसे जमा करते. युक्रेनने याआधीही काळ्या समुद्रात अशा जहाजांना टार्गेट केले आहे.

२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध शमण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. त्यात आता हे युद्ध सीमांपुरते मर्यादित नाही. या युद्धाने समुद्रात, रणनीती आणि जागतिक राजकारणापर्यंत विस्तार केला आहे. अलीकडेच युक्रेनने रशियाच्या शॅडो फ्लीटशी निगडित एका तेल टँकरवर ड्रोन हल्ला केला. हा हल्ला युक्रेनच्या सीमेपासून २ हजार किमी दूर अंतरावरील लीबिया समुद्र किनारी करण्यात आला. युक्रेनचा रशियाविरोधात हा पहिलाच आक्रमक हल्ला मानला जातो. हा हल्ला अशावेळी झाला जेव्हा रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन पत्रकार परिषद घेत होते.
पुतिन यांनी इशारा दिला होता की, जर रशियाच्या शॅडो फ्लीटला टार्गेट बनवले गेले तर त्याचे प्रत्युत्तर दिले जाईल. त्यानंतर अशा हल्ल्याने तेल पुरवठा थांबणार नाही परंतु नवीन धोके नक्कीच निर्माण होतील असं त्यांनी सांगितले होते. शॅडो फ्लीट त्या जहाजांना म्हटलं जाते ज्याचा वापर रशिया निर्बंधापासून वाचवण्यासाठी करते. या जहाजांची संख्या जवळपास १ हजाराहून अधिक आहे. ही जहाजे वारंवार त्यांचे झेंडे बदलत राहतात. त्यामुळे त्यांचा मालकी हक्क कुणाकडे असतो हे कळत नाही.
जहाजावरील हल्ल्यानंतर युक्रेन काय म्हणालं?
या नेटवर्कच्या माध्यमातून रशिया कच्चे तेल विकून युक्रेन युद्धात पैसे जमा करते. युक्रेनने याआधीही काळ्या समुद्रात अशा जहाजांना टार्गेट केले आहे. युक्रेनच्या सुरक्षा सेवेतील एका सूत्राने सांगितले की, हा हल्ला विशेष अभियानातून करण्यात आला. त्यात ड्रोन कसे आणि कुठून लॉन्च करण्यात आले त्याची माहिती त्यांनी दिली नाही. ज्या जहाजावर हल्ला करण्यात आला ते रिकामे होते, त्यातून पर्यावरणाचे नुकसान झाले नाही. युक्रेन आता जगात कुठेही आपल्या शत्रूला टार्गेट करू शकतो हे स्पष्ट झाले आहे असं सांगण्यात आले.
आता पोलंडवर हल्ला होणार, झेलेन्स्की यांचा दावा
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी पोलँडबाबत मोठं विधान केले. जर युक्रेन पराभूत झाला तर रशियाचे पुढील टार्गेट पोलंड होऊ शकतो. त्यामुळे युक्रेन आणि पोलंडला एकत्रित उभे राहावे लागेल. युक्रेनने पोलंडला ड्रोन सुरक्षा आणि बाल्टिक समुद्रात देखरेखीबाबत प्रस्ताव दिला आहे. दुसरीकडे अमेरिकेने रशियाबाबत वेगळी भूमिका घेतली आहे. व्हेनेझुएलावरून रशियासोबत तणाव वाढण्याची अमेरिकेला चिंता नाही असं अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी म्हटलं. अमेरिकेने अलीकडच्या काही महिन्यांत कॅरिबियनमधील जहाजांवर कारवाई केली आहे आणि व्हेनेझुएलाच्या तेल व्यापारावर आपली पकड घट्ट करत आहे.