मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 09:08 IST2025-12-29T09:07:04+5:302025-12-29T09:08:28+5:30
या स्वागतामुळे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या एका मोठ्या राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या एका मोठ्या राजकीय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. इजिप्तच्या तुरुंगातून तब्बल १४ वर्षांनंतर सुटका झालेल्या अला अब्द एल-फत्ताह या मानवाधिकार कार्यकर्त्याचे स्टार्मर यांनी स्वागत केले. मात्र, हे स्वागत त्यांना आता चांगलेच महागात पडले असून, स्वतःच्याच देशात त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. फत्ताह याच्या जुन्या हिंसक आणि ज्यूविरोधी सोशल मीडिया पोस्ट समोर आल्यानंतर ब्रिटनमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नेमका वाद काय?
अला अब्द एल-फत्ताह हा ब्रिटीश-इजिप्शियन नागरिक असून, तो गेल्या अनेक वर्षांपासून इजिप्तमध्ये कैद होता. त्याची सुटका व्हावी यासाठी ब्रिटनच्या अनेक सरकारांनी प्रयत्न केले. अखेर सप्टेंबर २०२५ मध्ये इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षांनी त्याला माफी दिली आणि तो शुक्रवारी लंडनला परतला. पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी फत्ताहच्या पुनरागमनाबद्दल आनंद व्यक्त करत त्याचे स्वागत केले. मात्र, विरोधकांनी फत्ताहचे जुने ट्विट्स उकरून काढले आहेत, ज्यात त्याने कथितपणे हिंसाचाराचे आणि पोलीस हत्येचे समर्थन केले होते.
विरोधक आक्रमक: 'पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी'
कंझर्व्हेटिव्ह पार्टीचे नेते रॉबर्ट जेनरिक यांनी स्टार्मर यांच्यावर थेट हल्ला चढवला आहे. "पंतप्रधानांना फत्ताहच्या हिंसक पार्श्वभूमीबद्दल माहिती नव्हती का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ज्या व्यक्तीने ज्यूविरोधी भाषा वापरली आणि हिंसेला चिथावणी दिली, त्याचे पंतप्रधान सार्वजनिक स्वागत कसे करू शकतात? असा प्रश्न विचारत त्यांनी स्टार्मर यांनी आपले समर्थन मागे घेण्याची मागणी केली आहे.
कोण आहे हा अला अब्द एल-फत्ताह?
४३ वर्षीय फत्ताह हा सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि लेखक आहे. २०११ मध्ये इजिप्तमध्ये झालेल्या लोकशाहीवादी क्रांतीचा तो एक प्रमुख चेहरा होता. डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून राजकीय सुधारणांसाठी तो आवाज उठवत असे. मात्र, इजिप्त सरकारने त्याच्यावर खोटी माहिती पसरवणे आणि विनापरवाना आंदोलने करणे असे आरोप लावून त्याला अनेकदा तुरुंगात डांबले होते. २०२१ मध्ये त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती, परंतु आंतरराष्ट्रीय दबावानंतर त्याची सुटका करण्यात आली.
सरकारची बचावात्मक भूमिका
वाढता वाद पाहून ब्रिटीश परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. "एका ब्रिटीश नागरिकाची सुटका करून त्याला कुटुंबाशी मिळवून देणे हे सरकारचे प्राधान्य होते. मात्र, याचा अर्थ आम्ही त्याच्या सोशल मीडिया पोस्टचे समर्थन करतो असे नाही. त्याचे ते जुने विचार अत्यंत घृणास्पद असून सरकार त्याचा निषेधच करते," असे प्रवक्त्याने म्हटले आहे. पंतप्रधानांच्या एका या स्वागताने आता ब्रिटनमध्ये 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध कट्टरतावाद' असा नवा वाद पेटवला आहे.