ब्रिटनमध्ये ७५ टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण, तरीही मार्चनंतर एका दिवसात रेकोर्ड ब्रेक मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 17:09 IST2021-08-11T17:09:09+5:302021-08-11T17:09:59+5:30
ब्रिटनमध्ये कोरोना विरोधी लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी मंगळवारी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...

ब्रिटनमध्ये ७५ टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण, तरीही मार्चनंतर एका दिवसात रेकोर्ड ब्रेक मृत्यू!
ब्रिटनमध्ये कोरोना विरोधी लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू असली तरी मंगळवारी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मार्च महिन्यानंतर आज पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये कोरोनामुळे रेकॉर्ड ब्रेक मृत्यूंची नोंद झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे ब्रिटनमध्ये १८ वर्षांवरील ७५ टक्के नागरिकांचं कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण झालेलं आहे. असं असतानाही कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा भीतीदायक ठरताना दिसत आहे. (UK reports biggest daily Covid 19 deaths since March even as 75 percent adults fully vaccinated)
ब्रिटनमध्ये जवळपास ८९ टक्के नागरिकांना कोरोना विरोधी लसीचा पहिला डोस देण्यात आलं आहे. याशिवाय देशातील कोरोना निर्बंधांमध्ये बहुतांश प्रमाणात सूट देखील देण्यात आली आहे.
सरकारनं दिलेल्या आकडेवारीनुसार, ब्रिटनमध्ये मंगळवारी १४६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासह देशातील मृत्यूंची एकूण संख्या १ लाख ३० हजार ५०३ इतकी झाली आहे. गेल्या सात दिवसांत २८ दिवसांच्या आत कोरोना संक्रमित झालेल्या रुग्णांमध्ये मृत्यूच्या प्रमाणात १४.८ टक्क्यांची वाढ देखील नोंदविण्यात आली आहे. मृत्यूंचा वाढता दर अधिकाऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.
डेल्टा व्हेरिअंटनं वाढवली चिंता
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिअंटनं एक भीषण संकट उभं केलं आहे. कारण देशात आढळणाऱ्या नव्या रुग्णांमागे ९९ टक्के डेल्टा व्हेरिअंटच कारणीभूत ठरला आहे. कोरोना विषाणूला कोरोनाची लस घेतलेले नागरिक देखील पसरवू शकतात असा अहवाल पब्लिक हेल्थ इंग्लंडनं दिला होता. ज्यापद्धतीनं लसीकरण न झालेले व्यक्ती कोरोना विषाणूचे प्रसारक ठरू शकतात त्याचपद्धतीनं लसीकरण झालेले व्यक्ती डेल्टा व्हेरिअंटचे प्रसारक ठरू शकतात, असं अहवालात नमूद करण्यात आलं होतं.