Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 09:18 IST2025-11-12T09:17:22+5:302025-11-12T09:18:58+5:30
Delhi Blast News: दिल्लीत झालेल्या स्फोटात अनेक निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला.

Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांवर प्रतिक्रिया देताना तुर्कीने दुहेरी भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तुर्कीने पाकिस्तानमधील स्फोटाचा निषेध करताना त्याला थेट 'दहशतवादी हल्ला' असे म्हटले, तर दिल्लीतील स्फोटाला केवळ 'स्फोट' असे संबोधून परिस्थिती कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. दिल्लीतील स्फोट १० नोव्हेंबरला संध्याकाळी झाला. तर, पाकिस्तानमधील घटना ११ नोव्हेंबरला काही तासांनंतर उघडकीस आली.
तुर्कीच्या या दोन वेगवेगळ्या विधानांमध्ये दुहेरी निकष स्पष्टपणे दिसून येतो. इस्लामाबादमधील स्फोटावर प्रतिक्रिया देताना तुर्कीने या घटनेला स्पष्टपणे 'दहशतवादी हल्ला' असे संबोधले. तर, नवी दिल्लीत १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटावर निवेदन प्रसिद्ध करताना, तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने 'भारतात हल्ला' असे म्हटले.
पाकिस्तानात झालेल्या हल्ल्याबद्दल तुर्कीने काय म्हटले?
"आज (११ नोव्हेंबर) पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत तुर्की पाकिस्तानसोबत एकजुटीने उभा राहील." तुर्कीची ही कठोर भूमिका दहशतवादाविरुद्धच्या त्यांच्या धोरणाशी सुसंगत दिसते.
भारताबद्दल काय म्हटले?
तुर्कीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, आम्ही भारतीय स्फोटात मरण पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांबद्दल शोक व्यक्त करतो. तसेच जखमींना लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतो. महत्त्वाचे म्हणजे, या निवेदनात 'दहशतवादी हल्ला' या शब्दाचा स्पष्टपणे उल्लेख करणे टाळण्यात आले.
दिल्लीतील स्फोटावर पाकिस्तानचे विधान
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिल्लीतील हल्ल्याला कमी लेखले. त्यांनी या घटनेला केवळ 'गॅस सिलेंडरचा स्फोट' असल्याचे म्हटले आणि भारत राजकीय फायद्यासाठी 'परिस्थितीचा गैरफायदा घेत आहे' असा आरोप केला. एका पाकिस्तानी टीव्ही कार्यक्रमादरम्यान आसिफ म्हणाले की, "कालपर्यंत हा गॅस सिलेंडरचा स्फोट होता, पण आता ते याला परदेशी षड्यंत्र म्हणत आहेत. भारतीय नेते या घटनेचे राजकारण करत आहेत."