अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 16:33 IST2026-04-09T16:28:09+5:302026-04-09T16:33:53+5:30
युद्धविरामाच्या अटींमध्ये लेबनानचा उल्लेख नाही असं त्यांनी दावा केला. अमेरिकेनेही त्याला पुष्टी दिली.

अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
४० दिवसांच्या इराण युद्धानंतर ८ एप्रिलला सकाळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केली. परंतु पाकिस्तानच्या मध्यस्थीनं झालेल्या या युद्धविरामाला अमेरिकेचा सहकारी देश इस्रायलनं २४ तासांत फुस्स केले आहे. इस्रायलनं इराणी सहकारी देश लेबनानवर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला आहे. इस्रायली सैन्याने लेबनानच्या हिजबुल्लाह ठिकाणांवर १० मिनिटांत १०० हून अधिक हल्ले केले. ज्यात कमीत कमी २५४ जणांचा मृत्यू झाला आहे तर ११६५ लोक जखमी झालेत. हिजबुल्लाहच्या कमांड सेंटरवरही इस्रायलने मिसाइल आणि बॉम्बवर्षाव केला.
तुर्की समर्थनार्थ पुढे आला
इस्रायली हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आम्हालाही आहे असं लेबनानमधील हिजबुल्लाह संघटनेने म्हटलं आहे. तुर्कीनेही लेबनानवरील इस्रायलच्या हल्ल्यांचा निषेध केला आहे, ज्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. आम्ही लेबनानवरील वाढत्या इस्रायली हल्ल्यांचा तीव्र निषेध करतो. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमुळे देशातील मानवी परिस्थिती आणखी बिकट होत आहे असं तुर्कीच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
युद्धविरामाचे इस्रायलकडून उल्लंघन?
मध्य पूर्वेत युद्धविराम जाहीर झाला असूनही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना सातत्याने सुरुंग लावत आहे असं तुर्कीने म्हटलं आहे. तुर्कीने लेबनानच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला आपला पाठिंबा पुन्हा व्यक्त केला आहे. लेबनानवरील हल्ल्यांना युद्धविरामाचे उल्लंघन म्हणून मान्यता देण्यास नकार इस्रायलने दिला आहे. युद्धविरामाच्या अटींमध्ये लेबनानचा उल्लेख नाही असं त्यांनी दावा केला. अमेरिकेनेही त्याला पुष्टी दिली. त्यामुळे इस्लामाबादसोबतच्या चर्चा अडचणीत आल्याचे दिसत आहे.
इराण संतापला
लेबनानमधील इस्रायली हल्ल्यांनी भीषण रक्तपात पाहून इराण भडकला आहे. हे युद्धविरामाचे उल्लंघन असल्याचं म्हणत इराणनं पुन्हा होर्मुझ सामुद्रधुनी बंद केली आहे. दुसरीकडे इराण पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चर्चेपासूनही लांब राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानमधील इराणी राजदूतांनीही त्यांच्या सोशल मीडियावरून चर्चेच्या पोस्ट डिलिट केल्या आहेत. लेबनानवर झालेल्या इस्रायली हल्ल्यानंतर इराण आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या शांतता चर्चेवरही संशयाचे ढग दाटल्याने पाकिस्तानचा प्लॅन फुस्स झाला आहे. अमेरिका इराणमध्ये युद्धविराम करून पाकिस्तान स्वत:ची पाठ ठोपटवत होते. बुधवारी इस्रायली विमानांनी मध्य बेरूतमधील मजरा, मनारा, ऐन अल मरेसेह आणि बरबोर परिसरासह दक्षिणी उपनगरातील ८ ठिकाणांवर हल्ले केले आहेत.