ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे अमेरिकेचे नुकसान? या देशात अमेरिकी सैनिकांना हाकलून देण्याची वाढली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 16:12 IST2026-03-30T15:55:29+5:302026-03-30T16:12:33+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयांचा पूर्ण जगावर परिणाम होत आहे. परिणामी, जर्मनीमध्ये तैनात असलेले सुमारे ४०,००० सैनिक मागे घेण्याची मागणी होत आहे. उजव्या विचारसरणीच्या पक्षाने चान्सलर मेर्ट्झ यांच्याकडे ही मागणी सुरू आहे. जर्मनीचे परराष्ट्र धोरण यापुढे अमेरिकेशी संलग्न असू नये, अशी मागणी सुरू आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयांमुळे अमेरिकेचे नुकसान? या देशात अमेरिकी सैनिकांना हाकलून देण्याची वाढली मागणी
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यापासून त्यांच्या निर्णयांनी मित्रराष्ट्रांमध्ये नाराजी पसरली आहे. याचे पडसाद आता जर्मनीमध्ये तीव्रपणे उमटत असून, तेथे तैनात असलेल्या ४०,००० अमेरिकन सैनिकांना देशाबाहेर काढण्याची आणि अमेरिकेचे लष्करी तळ नष्ट करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि जर्मनीचे संबंध अत्यंत दृढ होते. मात्र, इराण युद्ध आणि 'नाटो'मधील अमेरिकेची मनमानी यामुळे जर्मनी आता वॉशिंग्टनपासून स्वतंत्र परराष्ट्र धोरण आखण्याच्या तयारीत आहे. जर्मनीतील 'अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी' या पक्षाने थेट अमेरिकन अण्वस्त्रे हटवण्याचा इशारा दिल्याने जागतिक राजकारणात खळबळ उडाली आहे.
इराणमध्ये आमचं सैन्य पाठवणार नाही; ऐन युद्धात इस्रायलनं केलेल्या घोषणेनं अमेरिका पडली एकाकी
अहवालानुसार, जर्मनीमध्ये ४०,००० हून अधिक अमेरिकन सैनिक तैनात आहेत. याव्यतिरिक्त, तेथे १२ हून अधिक लष्करी तळ आहेत. सध्या, जर्मनीचा रामस्टाईन हवाई तळ हा इराणवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले करण्यासाठीचा तळ आहे. यामुळे, जर्मनीला भीती आहे की त्यांनाही लक्ष्य केले जाऊ शकते. या हवाई तळाच्या आसपास अमेरिकेचे इतके व्यापक नियंत्रण आहे की या परिसराला युरोपचे 'मिनी-अमेरिका' असेही म्हटले जाते.
मात्र, गेल्या वर्षभरात अमेरिका आणि जर्मनी यांच्यातील तणाव वाढत आहे. ट्रम्प जर्मनीमधून आपले सैन्य मागे घेण्याचा विचार करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र, या प्रकरणी अद्याप कोणतेही ठोस विधान करण्यात आलेले नाही.
सैन्य हटवण्याची मागणी
पक्षाचे नेते टिनो चुपाना यांनी ४०,००० अमेरिकन सैनिकांना तात्काळ मायदेशी पाठवण्याची मागणी केली आहे.
अण्वस्त्रे आणि तळ
जर्मनीतील अमेरिकेच्या मालकीच्या अणुसुविधा आणि लष्करी तळ नष्ट करून देश 'स्वतंत्र' करण्याची मागणी करण्यात आली आहे.
इराण युद्धाचा विरोध
चान्सलर मेर्ट्झ यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केला आहे की, अमेरिकेने इराणमधील युद्ध संपवण्याऐवजी ते अधिक पेटवले आहे, ज्यामुळे जागतिक तणाव वाढला आहे.
मिनी-अमेरिका' धोक्यात
जर्मनीतील 'रामस्टाईन हवाई तळ' हा सध्या अमेरिकेचा इराणवरील हल्ल्यांचा मुख्य केंद्र आहे. या तळावर अमेरिकेचे पूर्ण नियंत्रण असल्याने जर्मनीला स्वतःवर हल्ल्याची भीती वाटत आहे.
जानेवारी २०२५ मध्ये पदभार स्वीकारल्यापासून, ट्रम्प यांनी नाटोसह अनेक देशांशी गैरसोयीचे वर्तन केले आहे. मग ते कॅनडाच्या पंतप्रधानांना 'गव्हर्नर' म्हणणे असो किंवा झेलेन्स्कींवर जाहीरपणे टीका करणे असो. ट्रम्प यांनी युरोपीय प्रदेश असलेल्या ग्रीनलँडला आपल्यात सामील करून घेण्याची योजनाही आखली होती. या विरोधाला इतकी तीव्र प्रतिक्रिया आली की युरोपीय देशांनी त्याच्या संरक्षणासाठी सैन्य तैनात करण्यास सुरुवात केली. इराण युद्धानंतर परिस्थिती इतकी बिघडली की ट्रम्प यांनी नाटो देशांना 'भित्रे' म्हटले. इतकेच नाही, तर त्यांनी अलीकडेच जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटनच्या नेत्यांविरुद्ध अपमानास्पद भाषा वापरली आहे.