ट्रम्प यांनी दिलेला युद्धबंदीचा आदेश; अवघ्या ४५ दिवसांच मोडला! थायलंडचे कंबोडियावर हवाई हल्ले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 09:19 IST2025-12-08T09:14:21+5:302025-12-08T09:19:50+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या मध्यस्थीने ऑक्टोबरमध्ये कुआलालंपूर येथे शांती करार करण्यात आला होता. मात्र..

ट्रम्प यांनी दिलेला युद्धबंदीचा आदेश; अवघ्या ४५ दिवसांच मोडला! थायलंडचे कंबोडियावर हवाई हल्ले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी करून केवळ ४५ दिवसांपूर्वी ज्या दोन आग्नेय आशियाई देशांमध्ये युद्धविराम घडवून आणला होता, त्या थायलंड आणि कंबोडिया यांच्यात पुन्हा एकदा मोठा संघर्ष उफाळला आहे. थायलंडने कंबोडियाच्या सीमेवरील लष्करी तळांवर हवाई हल्ला केला असून, दोन्ही देशांनी एकमेकांवर युद्धविराम कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
हवाई हल्ल्याचे कारण काय?
थाई लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी झालेल्या एका कंबोडियाई हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हा हवाई हल्ला करण्यात आला आहे. कंबोडियाच्या हल्ल्यात थायलंडचा एक सैनिक शहीद झाला, तर दोन अन्य जवान जखमी झाले होते. थाई सैन्याने सांगितले की, उबोन रत्चाथानी प्रांतातील दोन भागांत हिंसेचा भडका उडाला. या प्रत्युत्तरादाखल थायलंडने कंबोडियाच्या लष्करी तळांवर हवाई हल्ले केले.
कंबोडियाची प्रतिक्रिया काय?
कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयाने या हवाई हल्ल्यांची पुष्टी केली आहे. ८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ५:०४ वाजता थाई सैन्याने प्रेह विहियर प्रांतातील अन सेस भागात कंबोडियाई सैन्यावर हल्ला केला, असे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. कंबोडियाने या हल्ल्यानंतर आम्ही पलटवार केला नाही आणि थायलंडच्या अमानुष व क्रूर कारवाईचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो, असे म्हटले आहे. हा हल्ला २६ ऑक्टोबर रोजी झालेल्या युद्धविराम कराराचे थेट उल्लंघन असल्याचे कंबोडियाने नमूद केले.
ट्रम्प यांनी घडवला होता करार
या दोन्ही शेजारील देशांमध्ये जुलै महिन्यात सीमावादामुळे मोठा संघर्ष झाला होता. ५ दिवस चाललेल्या या युद्धात ४८ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे ३ लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले होते. याच पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांच्या मध्यस्थीने ऑक्टोबरमध्ये कुआलालंपूर येथे शांती करार करण्यात आला होता. मात्र, थायलंडच्या हवाई हल्ल्याने हा शांतता करार आता धोक्यात आला आहे.