‘ग्रीनलँड’वरून ट्रम्पने दिलेली ‘टॅरिफ’ची धमकी घेतली मागे; ८ युरोपीय देशांवरील योजना रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 09:25 IST2026-01-23T09:23:44+5:302026-01-23T09:25:17+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बोर्ड ऑफ पीस’चे झाले उद्घाटन

‘ग्रीनलँड’वरून ट्रम्पने दिलेली ‘टॅरिफ’ची धमकी घेतली मागे; ८ युरोपीय देशांवरील योजना रद्द
दावोस: आर्क्टिक प्रदेशातील ग्रीनलँड बेटावर नियंत्रण मिळवण्यासाठी दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने आठ युरोपीय देशांवर आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची योजना रद्द करत असल्याचे अमेरिकेने बुधवारी स्पष्ट केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात त्यांच्या ‘ट्रूथ सोशल’ या वेबसाइटवर पोस्ट प्रसिद्ध केली असून, यामध्ये ट्रम्प यांनी आर्क्टिक सुरक्षेबाबत नेटो प्रमुखांसोबत एका आराखड्यावर सहमती झाली आहे. त्या आराखड्याने या प्रदेशात निर्माण झालेला भू-राजकीय तणाव कमी होईल, अशी शक्यता असल्याने टॅरिफचा निर्णय मागे घेत असल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी ग्रीनलँडवर पूर्ण अधिकार व मालकी अमेरिकेला हवी असल्याचे वादग्रस्त विधान केले होते.
‘ग्रीनलँडविषयी आम्हाला देणंघेणं नाही’
ट्रम्प यांनी ग्रीनलँड विकत घेण्याच्या मागणीमुळे ‘नेटो’च्या एकतेला तडा जात असतानाच, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मात्र या विषयावर काहीही देणेघेणे नसल्याचे म्हटले. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या बैठकीत दूरचित्रवाणीवरील भाषणात पुतीन यांनी ग्रीनलँडचे काय होते, याच्याशी आमचा कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट केले. डेन्मार्कने ग्रीनलँडला नेहमी वसाहतीसारखी वागणूक दिली आहे. त्यांच्याशी ते खूप कठोर, किंबहुना निर्दयी राहिले आहेत; पण तो पूर्णपणे वेगळा विषय आहे, असेही यांनी पुतीन म्हटले.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘बोर्ड ऑफ पीस’चे झाले उद्घाटन
गाझाच्या पुनर्बांधणीसाठी अनेक देशांच्या मदतीची मोट बांधणाऱ्या ‘बोर्ड ऑफ पीस’चे गुरुवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोस आर्थिक परिषदेत उद्घाटन केले. या मंचाच्या माध्यमातून जगभरात सुरू असलेली युद्धे, यादवी यावर तोडगा निघेल. जगभरातील आठ युद्धांना विराम दिल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. हा मंच संयुक्त राष्ट्राला शह देण्यासाठी तयार केला, असा संशय माध्यमांनी व्यक्त केला. मात्र ट्रम्प यांनी हा मंच संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने काम करेल, असा दावा केला. ‘बोर्ड ऑफ पीस’मध्ये सामील होण्यासाठी ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही निमंत्रण पाठवले होते. पण प्रत्यक्ष उद्घाटन कार्यक्रमात भारत अनुपस्थित राहिला.