ट्रम्प यांनी काढला मित्रदेशांवर राग; आता मदतीसाठी पुढे येणार नाही, तेलाचे दर वाढले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 06:33 IST2026-04-01T06:32:44+5:302026-04-01T06:33:04+5:30
अमेरिकेचा इराणच्या अणू कार्यक्रमाशी निगडित ठिकाणावर हल्ला, तर इराणने कुवेतच्या तेल टँकरला केले लक्ष्य; अमेरिकी कंपन्यांना टार्गेट करण्याची दिली इराणने धमकी

ट्रम्प यांनी काढला मित्रदेशांवर राग; आता मदतीसाठी पुढे येणार नाही, तेलाचे दर वाढले
दुबई: यापुढे अमेरिका कोणत्याही देशाच्या मदतीसाठी पुढे येणार नाही. ब्रिटनसारख्या देशांना जर होर्मुझ सामुद्रधुनीतून इंधन मिळत नसेल, तर त्यांनी अमेरिकेकडून तेल खरेदी करावे. इतर देशांनी धैर्य दाखवून स्वतः होर्मुझ सामुद्रधुनीत जाऊन तेल आणावे. जसे ते अमेरिकेच्या मदतीला धावून आले नाहीत, तसेच अमेरिका देखील त्यांच्या मदतीसाठी जाणार नाही, अशी भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी मांडली आहे.
इराणमधील इस्फहान शहरात अणू कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणावर अमेरिकेने मंगळवारी पहाटे हल्ला केला. त्याचा व्हिडीओ ट्रम्प यांनी शेअर केला. तर इराणने कुवेतच्या एका तेलाच्या टँकरवर मारा केला.
ट्रम्प यांनी तेलाबाबत इतर देशांना मदत न करण्याची भूमिका घेतल्याने मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत ६ टक्के वाढ झाली. यामुळे कच्चे तेल ११९ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. यामुळे भारताची तेल आयात महाग होणार असून, देशात महागाई वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अमेरिकन पेट्रोलची किंमत २०२२ नंतर प्रथमच चार डॉलर प्रति गॅलनवर पोहोचली.
होर्मुझ सामुद्रधुनीत टोल आकारा; संसदेची मंजुरी
इराणच्या संसदेच्या सुरक्षा समितीने 'होर्मुझ सामुद्रधुनी व्यवस्थापन योजना' मंजूर केली. त्यानुसार या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल आकारण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र तिथून अमेरिका, इसायलच्या जहाजांना प्रवेशबंदी आहे. या योजनेत रियाल-आधारित टोल प्रणाली लागू करणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे.
इराणकडून भारताला तेल निर्यात पुन्हा सुरू
अमेरिकेने निर्बंधांमध्ये ३० दिवसांची सवलत दिल्यानंतर भारत आणि इराणमधील तेल व्यापार पुन्हा एकदा सुरू झाला आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच इराणच्या कच्च्या तेलाने भरलेले एक जहाज गुजरातच्या किनाऱ्याकडे निघाले असून, ते ४ एप्रिलपर्यंत 'वाडीनार' बंदरात पोहोचण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय रिफायनरींना दिलासा मिळणार आहे.
अमेरिकी कंपन्यांवर हल्ला करू : इराण
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉप्सने म्हटले की ते परिसरातील अमेरिकी तंत्रज्ञान कंपन्यांवर हल्ला करू शकतात. आयआरजीसीने या कंपन्यांमधील रहिवासी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ परिसर रिकामा करण्याचे आवाहन केले आहे. गूगल, अॅपल, मेटा, टेस्ला आणि बोईंग यांसारख्या कंपन्या हल्ल्यांचे नियोजन आणि देखरेख करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्यांना टार्गेट केले जाण्याची शक्यता आहे. जर इराणी नेत्यांवरील हल्ले सुरूच राहिले, तर बुधवारी रात्री ८ वाजल्यानंतर कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा आयआरजीसीने दिला आहे.