India Pakistan Conflict: भारताच्या लष्कराने पाकिस्तानचे मोठे नुकसान केल्यानंतर भारत सरकार आता 'डिप्लोमॅटिक' पद्धतीने पाकिस्तानवर जागतिक पातळीवर दबाव वाढविण्याच्या तयारीत आहे. पाकिस्तान कसा दहशतवादाचा पोशिंदा आहे, हे ठसवण्यासाठी आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देण्यासाठी जगातील प्रमुख ७-८ देशांमध्ये खासदारांची शिष्टमंडळे पाठविण्याची केंद्रातील मोदी सरकारची योजना आहे. भारताच्या या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान नवीन योजना आखत आहे. पाकिस्तानातून आता जगभरातील अनेक देशांमध्ये शांतीदूतांचे प्रतिनिधीमंडळ जाणार असल्याचे समजते.
पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी शनिवारी सांगितले की, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी दोन्ही देशांमधील अलीकडच्या तणावाच्या वाढत्या प्रकरणावर पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याचे काम माझ्यावर सोपवले आहे. दुसरीकडे, पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत प्रत्युत्तर दिले. परंतु, यानंतर पाकिस्तानने भारतीय नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत ड्रोन हल्ले केले. यामुळे दहशतवादाला आळा घालण्यात अपयश आणि भारतीय नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या कारवायांमुळे पाकिस्तानची विश्वासार्हता जागतिक स्तरावर ढासळली आहे. अशातच बिलावल भुट्टो झरदारी यांच्या शिष्टमंडळाला कठीण संघर्षाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानची सेवा करण्यासाठी वचनबद्ध राहण्याचा सन्मान
पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती मला केली. ही जबाबदारी स्वीकारण्याचा आणि या आव्हानात्मक काळात पाकिस्तानची सेवा करण्यासाठी वचनबद्ध राहण्याचा मला सन्मान वाटतो, असे झरदारी यांनी आपल्या फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. अनेकदा फसवे दावे आणि खोटी माहिती पसरवणारा पाकिस्तान जगासमोर नेमके काय सांगणार, याकडे भारताचे लक्ष असणार आहे.
दरम्यान, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगापुढे आणण्यासाठी भारत सरकारकडून विविध देशांमध्ये पाठविल्या जाणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांची यादी तयार केली आहे. या शिष्टमंडळांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी काँग्रेसचे खासदार शशी थरूर, भाजपाचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, शिंदेसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे, जनता दल (यू)चे संजयकुमार झा आणि द्रमुक नेत्या कनिमोझी करुणानिधी यांच्या खांद्यावर टाकली आहे. या सात शिष्टमंडळामध्ये चार नेते सत्ताधारी एनडीएमधील असून तीन इंडिया आघाडीकडून आहेत.