दाढीसाठी दीड लाखांची सर्जरी, सर्जन निघाला रिअल इस्टेट एजंट, ३ महिन्यात तरुणाचा मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 08:42 IST2026-02-18T08:40:25+5:302026-02-18T08:42:02+5:30
सौंदर्याच्या हव्यासापोटी एका २४ वर्षीय तरुणाने आपला जीव गमावल्याची धक्कादायक घटना समोर आली. फ्रान्समधील मैथ्यू विगियर लातूर याला दाढी येत नसल्याने त्याने तुर्कीमध्ये जाऊन १.५ लाख रुपये खर्चून बीअर्ड ट्रान्सप्लांट केले. पण...

दाढीसाठी दीड लाखांची सर्जरी, सर्जन निघाला रिअल इस्टेट एजंट, ३ महिन्यात तरुणाचा मृत्यू!
हल्लीच्या काळात तरुणांमध्ये दाढी ठेवण्याची मोठी क्रेझ पाहायला मिळते. मात्र, हीच क्रेझ एका २४ वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली. दाढी येत नसल्याच्या न्यूनगंडापोटी एका तरुणाने दीड लाख रुपये खर्च करून शस्त्रक्रिया केली, मात्र या शस्त्रक्रियेनंतर उद्भवलेल्या समस्यांमुळे तरुणाने नैराश्यातून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून तरुणांना अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेला बळी न पडण्याचे आवाहन केले जात आहे.
फ्रान्समध्ये राहणाऱ्या मैथ्यू विगियर लातूर या २४ वर्षीय तरुणाला दाढी नसल्यामुळे स्वतःबद्दल अपूर्ण वाटत होते. दाढीमुळे आपला चेहरा अधिक मर्दानी आणि आकर्षक दिसेल, असा त्याचा समज होता. फ्रान्समध्ये दाढी प्रत्यारोपणाचा खर्च खूप जास्त असल्याने त्याने स्वस्त पर्यायाचा शोध सुरू केला. इंटरनेटवर सर्च करत असताना त्याला तुर्कीमधील इस्तंबूल येथील एका क्लिनिकची माहिती मिळाली. फ्रान्समध्ये ज्या प्रक्रियेसाठी पाचपट जास्त पैसे लागतात, तीच प्रक्रिया इस्तंबूलमधील क्लिनिकने अवघ्या १,३०० युरो (सुमारे १.२५ ते १.५० लाख रुपये) मध्ये करून देण्याचे आश्वासन दिले. क्लिनिकच्या वेबसाईटवर तुर्कीच्या आरोग्य मंत्रालयाचा अधिकृत शिक्का पाहून मैथ्यूचा विश्वास बसला आणि तो मार्च २०२५ मध्ये शस्त्रक्रियेसाठी तुर्कीला गेला.
शस्त्रक्रिया झाल्यानंतर मैथ्यूच्या आयुष्याला भयंकर वळण मिळाले. काही दिवसांतच त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड सूज आली, इन्फेक्शन झाले आणि असह्य वेदना सुरू झाल्या. चेहरा सुधारण्याऐवजी पूर्णपणे विद्रूप झाला. नंतर धक्कादायक सत्य समोर आले की, ज्या व्यक्तीने मैथ्यूची शस्त्रक्रिया केली, तो कोणताही पात्र डॉक्टर किंवा सर्जन नव्हता, तर एक रिअल इस्टेट एजंट होता.
शस्त्रक्रियेनंतर फ्रान्सला परतलेल्या मैथ्यूची प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली. चेहरा विद्रूप झाल्यामुळे तो प्रचंड मानसिक धक्क्यात होता. त्याचे वडील जॅक यांच्या म्हणण्यानुसार, तो स्वतःला आरशात पाहतानाही घाबरू लागला. अखेर या विद्रूपतेचा आणि फसवणुकीचा धक्का सहन न झाल्याने शस्त्रक्रियेच्या अवघ्या तीन महिन्यांनंतर, जून २०२५ मध्ये मैथ्यूने आत्महत्या केली.
इस्तंबूल हे सध्या हेअर आणि बीअर्ड ट्रान्सप्लांटसाठी जागतिक केंद्र बनले आहे. मात्र, कमी पैशांचे आमिष दाखवून अनेक अनधिकृत क्लिनिक्स तिथे कार्यरत आहेत. मैथ्यूच्या कुटुंबाने आता या बनावट डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर लढा सुरू केला असून, अशा क्लिनिक्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. सौंदर्यासाठी कोणतीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी संबंधित डॉक्टरची पदवी, क्लिनिकचा परवाना आणि त्यांच्या अनुभवाची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. स्वस्त दराच्या नादात जीवाशी मुकावे लागण्याची शक्यत आहे.