आर्थिक संकटातील श्रीलंका एअरलाईन विकणार; वेतनासाठी नोटा छापणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2022 11:45 IST2022-05-18T06:02:00+5:302022-05-18T11:45:10+5:30
श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी जनतेला संबोधित करताना सांगितले की, एअरलाईन्सला गत आर्थिक वर्षात तब्बल १२४ दशलक्ष डॉलर्सचा फटका बसला.

आर्थिक संकटातील श्रीलंका एअरलाईन विकणार; वेतनासाठी नोटा छापणार
कोलंबो : आर्थिक संकटात सापडलेली श्रीलंका नुकसान भरून काढण्यासाठी राष्ट्रीय एअरलाईन विकण्याच्या तयारीत आहे. त्याचप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी नोटांची छपाई करण्यात येणार आहे.
श्रीलंकेचे पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांनी टीव्हीवरून जनतेला संबोधित करताना सांगितले की, एअरलाईन्सला मार्च २०२१मध्ये संपलेल्या वर्षात तब्बल १२४ दशलक्ष डॉलर्सचा फटका बसला. ज्यांनी विमानात पायही ठेवलेला नाही, त्यांच्यापर्यंत या नुकसानीची झळ जाता कामा नये, असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी आपल्याला नोटा छापाव्या लागणार आहेत. आपल्याकडे सर्वच साठे मर्यादित असून, तीन जहाज भरून क्रूड तेल व घासतेलची किंमत मोजण्यासाठी डॉलर्सची उभारणी करण्यात येत आहे. पुढील काही महिने आपल्यासाठी खूपच कठीण असणार आहेत. आपल्याला संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची आघाडी स्थापन करावी लागणार आहे.
दरम्यान, राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या विकास बजेटच्या जागी मदत बजेटची घोषणा करण्याचाही त्यांनी प्रस्ताव ठेवला. संसद ट्रेझरी बिलाची मऱ्यादा ३ ट्रिलियनवरून ४ ट्रिलियन करण्याचा प्रस्ताव ठेवणार आहे. डिसेंबर २०२२ मध्ये समाप्त होणाऱ्या वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादनातील आर्थिक तूट १३ टक्के असण्याचा अंदाज आहे, असेही विक्रमसिंघे यांनी म्हटले आहे.