"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 18:46 IST2025-12-25T18:44:50+5:302025-12-25T18:46:13+5:30
"हा असा देश आहे जिथे हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि ख्रिश्चन सर्वजण समानतेने राहतात. आपल्याला असा देश घडवायचा आहे जिथे महिला, पुरुष आणि मुले घराबाहेर पडल्यावर सुरक्षितपणे परत येतील."

"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
बांगलादेश राष्ट्रवादी पार्टीचे (BNP) कार्यवाहक अध्यक्ष तारिक रहमान हे तब्बल १७ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर गुरुवारी (२५ डिसेंबर २०२५) ब्रिटनमधून स्वदेशी अर्थात बांगलादेशात परतले. महत्वाचे म्हणजे, कट्टरपंथी शरीफ उस्मान हादीच्या हत्येनंतर बांगलादेशात तणावाचे वातावरण असतानाच रहमान यांचे आगमन झाले आहे. ढाक्यात पोहोचल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बांगलादेशचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्याशी चर्चा केली आणि सुरक्षा व्यवस्थेबद्दल त्यांचे आभार मानले.
मतभेद विसरून राष्ट्रनिर्माणासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे -
ढाका येथे एका रॅलीला संबोधित करताना तारिक रहमान म्हणाले, "बांगलादेशी जनतेला बोलण्याचे स्वातंत्र्य आणि लोकशाही व्यवस्था पुन्हा एकदा बळकट करायची आहे. आता सर्वानी मतभेद विसरून राष्ट्रनिर्माणासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे. यावेळी त्यांनी १९७१ चे युद्ध, १९७५ चा उठाव आणि १९९० च्या दशकातील जन आंदोलनांचाही उल्लेख केला. तसेच, आपल्या संपूर्ण भाषणात त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यावर विशेष भर दिला.
ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, ते म्हणाले, "हा असा देश आहे जिथे हिंदू, मुस्लिम, बौद्ध आणि ख्रिश्चन सर्वजण समानतेने राहतात. आपल्याला असा देश घडवायचा आहे जिथे महिला, पुरुष आणि मुले घराबाहेर पडल्यावर सुरक्षितपणे परत येतील."
शहीदांच्या स्वप्नातील बांगलादेश घडवणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली -
उस्मान हादीच्या हत्येचा उल्लेख करत तारिक म्हणाले, "देशातील लोकांना त्यांचे आर्थिक अधिकार परत मिळावेत, अशी त्यांची इच्छा होती. तसेच, '1971 आणि 2024 मधील शहिदांच्या रक्ताचे मोल चुकवण्यासाठी, आपल्याला अशा बांगलादेशाची निर्मिती करावी लागेल, ज्याचे स्वप्न त्यांनी बघितले होते, असेही ते म्हणाले.