शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:16 IST2025-11-04T11:16:04+5:302025-11-04T11:16:28+5:30
Titan Nasa Study: अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा आणि स्वीडनच्या चाल्मर्स विद्यापीठाने केलेल्या एका ताज्या संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
पृथ्वीवर रसायनशास्त्राचा एक मूलभूत नियम आहे की तेल आणि पाणी कधीही एकत्र मिसळत नाहीत, ते नेहमी वेगळे राहतात. अगदी शाळेतही आपल्याला हे प्रयोग करून दाखविले गेले आहेत. आजही आपण जेवणामध्ये देखील पाहतो. परंतू, शनीच्या सर्वात मोठ्या चंद्रासारख्या उपग्रहाने तेल आणि पाण्याला मिसळून टाकत केमिस्ट्रीला देखील फेल केले आहे.
शनीचा सर्वात मोठा चंद्र टायटनबाबत नासाने नुकताच एक शोध लावला आहे. अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा आणि स्वीडनच्या चाल्मर्स विद्यापीठाने केलेल्या एका ताज्या संशोधनात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार, टायटनच्या अत्यंत शीत वातावरणात, म्हणजे जिथे सरासरी तापमान -१८३ अंश सेल्सियस असते, तिथे तेल-सदृश पदार्थ आणि पाणी एकत्र मिसळून एकरूप होतात, असे समोर आले आहे.
सायन्सही झाले फेल!
बुध ग्रहाएवढा मोठा असलेल्या टायटनवर, पृथ्वीवर न मिसळणारे पदार्थ सहजपणे एकत्र विरघळतात. या संशोधनामुळे टायटनची भूगर्भ रचना, तसेच तेथील तलाव आणि समुद्र समजून घेण्यास मोठी मदत मिळणार आहे. टायटन हा शनी ग्रहाचा एकमेव चंद्र आहे ज्याला पृथ्वीसारखे दाट वातावरण आहे आणि त्याच्या पृष्ठभागावर द्रव पदार्थ असलेले जलाशय आहेत. या नवीन शोधामुळे टायटनवरील रसायनिक प्रक्रिया आणि जीवसृष्टीच्या संभाव्यतेबद्दलच्या कल्पनांना नवी दिशा मिळणार आहे, असे चाल्मर्स विद्यापीठातील रसायनशास्त्र आणि रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे असोसिएट प्रोफेसर मार्टिन रहम यांनी म्हटले आहे.