टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 05:45 IST2025-09-28T05:43:46+5:302025-09-28T05:45:11+5:30
एका करारामुळे टिकटॉक अमेरिकेत सुरू राहणार असून त्याचे नियंत्रण अमेरिकन गुंतवणूकदारांकडे जाईल.

टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
वॉशिंग्टन : जगभरात लोकप्रिय असलेले टिकटॉक भारतात सुरक्षेच्या कारणास्तव २०२० पासून बंद आहे. अमेरिकेतही या ॲपवर बंदीची तलवार लटकत असतानाच अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्या कराराला मंजुरी दिली. या करारामुळे टिकटॉक अमेरिकेत सुरू राहणार असून त्याचे नियंत्रण अमेरिकन गुंतवणूकदारांकडे जाईल. चीनच्या बाइटडान्स कंपनीची हिस्सेदारी २०% पेक्षाही कमी राहील. काय आहे ही डील समजून घेऊ यात.
कराराचे मुख्य मुद्दे
> टिकटॉकच्या अमेरिकन कामकाजासाठी नवीन संयुक्त उपक्रम (जॉइंट व्हेंचर) स्थापन.
> ओरेकल कंपनी क्लाऊड सेवा व सुरक्षा सांभाळणार.
> सिल्व्हर लेक व अबुधाबीस्थित एमजीएक्स फंड मोठे गुंतवणूकदार.
> अमेरिकन गुंतवणूकदारांची एकत्रित हिस्सेदारी : सुमारे ४५%.
>चीनच्या बाइटडान्सची हिस्सेदारी २०% पेक्षाही कमी; फक्त एक बोर्ड सीट.
> सहा अमेरिकन सदस्य टिकटॉक यूएसच्या नवीन बोर्डवर असणार.
कराराचे ५ ठळक परिणाम
चीनचा प्रभाव घटला - बाइटडान्सची हिस्सेदारी २०% पेक्षा कमी, १ बोर्ड सीट.
अमेरिकन नियंत्रण वाढले - नवीन बोर्डमध्ये ६ अमेरिकन सदस्य, ४५% अमेरिकन गुंतवणूक.
राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य - ओरेकल क्लाऊडवर डेटा व्यवस्थापन, चिनी हस्तक्षेप कमी.
आर्थिक स्थैर्य - टिकटॉकचे जाहिरात उत्पन्न, क्रिएटर्स व बाजारपेठ सुरक्षित.
आंतरराष्ट्रीय संदेश -अमेरिका-चीन संबंध शिथिल झाल्याचे जाहीर
ट्रम्प यांच्या मंजुरीमागील कारणे
राष्ट्रीय सुरक्षा : अमेरिकन नियंत्रणामुळे चीनच्या पाळत ठेवण्याचा धोका कमी.
आर्थिक हित : टिकटॉकची जाहिरात व उत्पन्न बाजारपेठ सुरक्षित.
राजकीय परिणाम : तरुणांमध्ये टिकटॉक लोकप्रिय; ट्रम्प समर्थक कमी होण्याचा परिणाम टाळला.
व्यावसायिक रणनीती : अमेरिकन गुंतवणूकदारांना प्राधान्य.
किंमत किती?
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेंस यांनी सांगितले की, टिकटॉक अमेरिकेची किंमत १४ अब्ज डॉलर ठरवण्यात आली आहे. “आम्ही टिकटॉक सुरू ठेवू इच्छित होतो; पण त्याच वेळी नागरिकांचा डेटा गोपनीयता कायद्यानुसार सुरक्षित राहावा, हेही सुनिश्चित करणे आवश्यक होते,” असे ते म्हणाले.