समुद्रात फिरतायत चीनच्या तीन युद्धनौका, या दोन देशांची झोप उडाली; आकाशातही तणाव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 19:56 IST2025-02-20T19:52:00+5:302025-02-20T19:56:51+5:30
यासंदर्भात, या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी निवेदन जारी केले आहे...

समुद्रात फिरतायत चीनच्या तीन युद्धनौका, या दोन देशांची झोप उडाली; आकाशातही तणाव!
चीन बऱ्याच काळापासून समुद्रात वर्चस्व गाजवत आला आहे. त्याने आता त्याच्या तीन युद्धनौका समुद्रात फिरण्यासाठी पाठवल्या आहेत. चीनच्या या कृत्यामुळे, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दोघेही सतर्क झाले आहेत. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आपल्या पूर्वेकडील किनाऱ्याजवळ आंतरराष्ट्रीय जल क्षेत्रात दिसून आलेल्या चिनी नौदलाच्या तीन युद्धनौकांच्या उपस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. यासंदर्भात, या दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी निवेदन जारी केले आहे.
गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियाच्या मुख्यभूमी किनाऱ्याजवळ एक फ्रिगेट, एक क्रूझर आणि एक पुरवठा टँकर आढळून आले होते. ही युद्धनौका आता ऑस्ट्रेलिया पूर्वेकडील किनाऱ्याजवळून खाली जात आहे. तसेच, माध्यमांतील वृत्तांनुसार, ही युद्धनौका सिडनीपासून 150 समुद्री मैल (278 किमी) पूर्वेत आहे.
"प्रत्येक हालचालीवर नजर" -
यासंदर्भात, ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लेस म्हणाले, "आम्ही त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर आमचे लक्ष आहे. कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांच्या कारवाया सुरू आहेत. ज्याप्रमाणे त्यांना आंतरराष्ट्रीय जल क्षेत्रात राहण्याचा अधिकार आहे, त्याचप्रमाणे आम्हालाही सतर्क राहण्याचा आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याचा अधिकार आहे."
न्यूझीलंड देखील लक्ष ठेऊन -
न्यूझीलंडच्या संरक्षण मंत्री ज्युडिथ कॉलिन्स म्हणाल्या, आपले संरक्षण सैन्य या जहाजांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांनी सांगितले की, हा नौदल टास्क ग्रुप आमच्या भागात का तैनात करण्यात आला आणि पुढे त्याचा प्लॅन काय, यासंदर्भात चीन सरकारने कुठलीही माहिती आम्हाला दिलेली नाही.
चीन-ऑस्ट्रेलिया यांच्यात आकाशातही तणाव -
तत्पूर्वी, गेल्या आठवड्यात, एका चिनी लढाऊ विमानाने दक्षिण चीन समुद्रात ऑस्ट्रेलियन लष्करी विमानाजवळ फ्लेअर्स टाकले होते. याला ऑस्ट्रेलियाने "असुरक्षित लष्करी क्रियाकलाप" म्हणून संबोधले होते. यानंतर, ऑस्ट्रेलियन विमानच "चीनच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत होते आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करत होते," असा आरोप चीनने केला होता.