'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 09:30 IST2025-12-18T09:29:49+5:302025-12-18T09:30:03+5:30
काही बांगलादेशी नेत्यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांचा संपर्क तोडण्याची भाषा केल्याने खळबळ माजली आहे.

'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र सजीव वाजेद जॉय यांनी भारतासाठी धोक्याची घंटा वाजवली आहे. बांगलादेशातील सध्याची अंतरिम सरकार देशाला कट्टरवादाकडे ढकलत असून, यामुळे भारताच्या ईशान्येकडील राज्यांच्या (सेव्हन सिस्टर्स) सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला आहे.
सजीव वाजेद यांनी एका मुलाखतीत सांगितले की, मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार 'जमात-ए-इस्लामी' सारख्या कट्टरपंथी संघटनांना मोकळे रान देत आहे. बांगलादेशात पुन्हा एकदा दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे सक्रिय होत असल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानशी वाढती जवळीक भारतासाठी डोकेदुखी ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे. काही बांगलादेशी नेत्यांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांचा संपर्क तोडण्याची भाषा केल्याने खळबळ माजली आहे.
भारतीय उच्चायुक्तालयावर निदर्शने
दुसरीकडे, बांगलादेशची राजधानी ढाका येथे तणाव अधिकच वाढला आहे. शेकडो कट्टरपंथी आंदोलकांनी भारतीय उच्चायुक्तालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला. 'जुलै युनिटी' या बॅनरखाली निघालेला हा मोर्चा पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रोखला. या घटनेनंतर भारताने बांगलादेशच्या उच्चायुक्तांना पाचारण करून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, बांगलादेशातील भारतीय दूतावास आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे ही तिथल्या सरकारची जबाबदारी आहे. तसेच, बांगलादेशात पसरवले जाणारे 'खोटे नॅरेटिव्ह' भारताने फेटाळून लावले असून तिथे निष्पक्ष निवडणुका घेण्याची गरज व्यक्त केली आहे.