'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 17:51 IST2025-11-10T17:49:48+5:302025-11-10T17:51:41+5:30
एकेकाळी अमेरिकेच्या दहशतवादी यादीत असलेल्या सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली.

'या' मुस्लिम देशाची अमेरिकेशी वाढतेय जवळीक! ब्लॅकलिस्टमधून बाहेर पडताच, ८० वर्षांनी अमेरिकेत एन्ट्री
आंतरराष्ट्रीय राजकारणात आज एक अविश्वसनीय आणि ऐतिहासिक घडामोड घडली आहे. एकेकाळी अमेरिकेच्या दहशतवादी यादीत असलेल्या सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. विशेष म्हणजे, १९४६ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ८० वर्षांनी सीरियाच्या कोणत्याही प्रमुखाचा हा पहिला अधिकृत अमेरिका दौरा ठरला आहे. अमेरिकेच्या दहशतवादी यादीतून बाहेर पडल्यानंतर ही भेट घडली आहे.
दहशतवादी यादीतून सुटका आणि लगेच भेटीची घाई!
जणू काही अमेरिकेने सीरियासाठी आपल्या धोरणांचे दार उघडले आहे. सीरियाचे नाव दहशतवादी यादीतून काढल्यानंतर काही तासांतच सीरियाचे राष्ट्राध्यक्ष अहमद अल-शारा वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. त्यांच्या या भेटीला आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. हा दौरा म्हणजे केवळ दोन देशांमधील नव्हे, तर संपूर्ण मध्य-पूर्व प्रदेशासाठी एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
ट्रम्प यांची नवी चाल?
ट्रम्प प्रशासनाच्या या अचानक बदललेल्या भूमिकेमागे मोठी रणनीती असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेने सीरियावरील सर्व आर्थिक आणि राजकीय निर्बंध हटवल्याने दोन्ही देशांमधील संबंध सुधारत आहेत. ट्रम्प प्रशासन शारा यांना इस्रायलसोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रोत्साहित करू इच्छित आहे.
सूत्रांनुसार, या भेटीत दहशतवादाविरोधात मोठा करार होण्याची शक्यता आहे. या करारानुसार, दमिश्कजवळ अमेरिकेचा लष्करी तळ उभारला जाऊ शकतो, ज्याने या प्रदेशात अमेरिकेची पकड मजबूत होईल.
५० वर्षांच्या असद राजवटीचा अंत!
अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने देखील या बदलाचे समर्थन केले आहे. ५० वर्षांहून अधिक काळ चाललेल्या असद राजवटीच्या समाप्तीनंतर सीरिया एका नव्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांचे मत आहे. एकंदरीत, एकेकाळी कट्टरपंथी गटाशी संबंध असलेले शारा आता जागतिक स्तरावर राजकारणी म्हणून स्वतःला सिद्ध करत आहेत आणि त्यांची ही ऐतिहासिक भेट जागतिक राजकारणात मोठे बदल घडवून आणू शकते.