"हीच ती वेळ, इराणला संपवा!" नेतन्याहूंच्या एका फोन कॉलने बदलला जगाचा इतिहास; ऑपरेशन 'एपिक फ्युरी'चा थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 11:23 IST2026-03-24T11:20:28+5:302026-03-24T11:23:10+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात झालेल्या एका गुप्त फोन कॉलने या युद्धाची दिशा ठरवली होती.

"हीच ती वेळ, इराणला संपवा!" नेतन्याहूंच्या एका फोन कॉलने बदलला जगाचा इतिहास; ऑपरेशन 'एपिक फ्युरी'चा थरार
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर झालेल्या अमेरिकन आणि इस्रायली हल्ल्याने अवघ्या जगाला हादरवून सोडले. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. मात्र, या भीषण हल्ल्याच्या ४८ तास आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात झालेल्या एका गुप्त फोन कॉलने या युद्धाची दिशा ठरवली होती, असा खळबळजनक खुलासा आता समोर आला आहे.
"हीच ती योग्य वेळ!" – नेतन्याहूंचा आग्रह
रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना फोन केला होता. यावेळी त्यांनी अत्यंत गोपनीय गुप्तचर माहितीचा हवाला देत ट्रम्प यांना सांगितले की, "इराणच्या नेतृत्वाला संपवण्यासाठी यापेक्षा दुसरी चांगली संधी मिळणार नाही. आताच निर्णायक घाव घालण्याची वेळ आली आहे." नेतन्याहू यांनी याला 'डेकेपिटेशन स्ट्राईक' असे नाव दिले होते, ज्याचा अर्थ शत्रूचे 'शीर्ष नेतृत्व' कापून काढणे असा होतो.
ऑपरेशन 'एपिक फ्युरी'ला हिरवा कंदील
या फोन कॉलच्या वेळी ट्रम्प लष्करी कारवाईसाठी आधीच तयार होते, मात्र हल्ल्याची वेळ आणि तीव्रता काय असावी यावर खल सुरू होता. नेतन्याहू यांनी ट्रम्प यांना पटवून दिले की, खामेनेई आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांवर हल्ला केल्यास इराणचे मनोबल खचेल आणि तिथली सत्ता उलथवून लावणे सोपे जाईल. या चर्चेनंतरच ट्रम्प यांनी 'ऑपरेशन एपिक फ्युरी'ला अंतिम मंजुरी दिली, ज्याला इस्रायलने 'ऑपरेशन रोअरिंग लायन' असे नाव दिले होते.
२८ फेब्रुवारीचा तो भीषण प्रलय
या गुप्त चर्चेनंतर ४८ तासांच्या आत, म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी पहाटे इराणच्या अनेक शहरांवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पडला. या हल्ल्यात केवळ अण्वस्त्र तळच नाही, तर खामेनेई यांचे निवासस्थान आणि लष्करी मुख्यालये उद्ध्वस्त करण्यात आली. यानंतर ट्रम्प यांनी स्वतः सोशल मीडियावरून खामेनेई यांच्या मृत्यूची घोषणा केली आणि सांगितले की, "इराणची अण्वस्त्रे बनवण्याची क्षमता आम्ही कायमची संपवली आहे."
"ट्रम्प यांना कोणीच सांगू शकत नाही काय करायचे!"
दुसरीकडे, या हल्ल्यानंतर इस्रायलने अमेरिकेवर दबाव आणल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, नेतन्याहू यांनी हे आरोप फेटाळून लावले. "डोनाल्ड ट्रम्प हे असे नेते आहेत ज्यांना काय करायचे हे कोणीही सांगू शकत नाही, तो निर्णय पूर्णपणे त्यांचाच होता," असे स्पष्टीकरण नेतन्याहू यांनी दिले. मात्र, आता समोर आलेल्या माहितीवरून हे स्पष्ट होत आहे की, नेतन्याहूंच्या त्या एका फोन कॉलने ट्रम्प यांना अंतिम निर्णयापर्यंत पोहोचण्यास मोठी मदत केली.