"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:04 IST2025-09-02T15:01:03+5:302025-09-02T15:04:23+5:30
एकीकडे पाकिस्तान पुराच्या पाण्याने हैराण झालेला असतानाच, दुसरीकडे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी मात्र मुक्ताफळे उधळली आहेत.

"पूर नव्हे, हा तर देवाचा आशीर्वाद"; पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी जनतेला दिला अजब सल्ला! म्हणाले...
एकीकडे पाकिस्तान पुराच्या पाण्याने हैराण झालेला असतानाच, दुसरीकडे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी मात्र मुक्ताफळे उधळली आहेत. पाकिस्तानी जनता हाल सोसत असतानाच पाकिस्तानचे मंत्री मात्र लोकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत. एकीकडे पाकिस्तानमध्ये पूर आणि अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना, संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. पूर स्थितीबद्दल विचारले असता, ख्वाजा यांनी लोकांना सांगितले की त्यांनी या घटनेला 'अल्लाहचा आशीर्वाद' मानून घरांमध्ये पाणी साठवून ठेवावे.
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ख्वाजा आसिफ म्हणाले की, "सध्या जगभरात पाण्याची टंचाई आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये पूर येणे हा एक सुखद योगायोग आहे. लोकांनी याला अल्लाहचा आशीर्वाद मानावा, ही काही आपत्ती नाही. हा अल्लाहचा आशीर्वाद आहे."
रस्त्यावर उतरण्याऐवजी पाणी साठवा!
पंजाब आणि खैबर प्रांतातील काही लोक पुरामुळे रस्ते अडवत आहेत आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. अशा लोकांना ख्वाजा आसिफ यांनी आधी पाणी साठवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे. "लोकांनी हे पाणी आपापल्या घरात भरून ठेवावे, म्हणजे गोंधळच संपेल," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, पाणी साठवण्यासाठी मोठे धरण आवश्यक आहे, जे सध्या शक्य नाही. त्यामुळे लोकांनी आपल्या घरातील वस्तूंमध्येच हे पाणी साठवावे. पूर थांबवण्यासाठी सरकारकडे कोणतीही व्यवस्था नाही आणि लोक उगाचच यासाठी सरकारला दोष देत आहेत, असेही ते म्हणाले. त्यांच्या मते, या परिस्थितीसाठी स्थानिक सरकार आणि अतिक्रमण करणारे लोक जबाबदार आहेत, कारण त्यांनीच पाण्याचा मार्ग बदलला आहे.
पंजाबमध्ये २० लाख लोक प्रभावित, ४१ मृत्यू
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पुरामुळे सुमारे २० लाख लोक थेट प्रभावित झाले आहेत. पंजाबच्या माहितीमंत्री अजमा बुखारी यांनी सांगितले की, पंजाबने पहिल्यांदाच असा पूर पाहिला आहे, कारण झेलम, चिनाब आणि रावी या तिन्ही नद्यांना एकाच वेळी पूर आला आहे.
पंजाब सरकारनुसार, आतापर्यंत पुरामुळे ४१ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर संपूर्ण पाकिस्तानात हा आकडा ८५० पर्यंत पोहोचला आहे. पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्यात पाकिस्तान सरकारला अपयश आले आहे.