"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 20:01 IST2025-06-17T19:58:58+5:302025-06-17T20:01:01+5:30
मॅक्रॉन यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानावरून ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली आहे...

"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी (17 जून, 2025) फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर चांगलेच भडकले. मॅक्रॉन यांनी नुकत्याच केलेल्या एका विधानावरून ट्रम्प यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविरामावर काम करण्यासाठी ग्रुप ऑफ सेवन (जी7) शिखर परिषदेतून लवकर गेले, असे मॅक्रॉन यांनी म्हटले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट करत म्हटले आहे, "पब्लिसिटीची हाव असलेले फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी, मी इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध विरामावर काम करण्यासाठी कॅनडातील जी-7 शिखर परिषद सोडून डीसीला पोहोचलो, असे चूकन म्हटले आहे.
इमॅन्युएल नेहमीच चुकीचे असतात -
ट्रम्प पुढे म्हणाले, "चूक! मी वॉशिंगटनला का जात आहे, हे त्यांना माहीत नाही. मात्र, याचा युद्धविरामाशी काहीही संबंध नाही. याहून मोठी गोष्ट म्हणजे, जाणूनबुजून असो किंवा अनावधानाने, इमॅन्युएल नेहमीच चुकीचे असतात. बघत रहा."
तत्पूर्वी, जी-7 शिखर परिषदेदरम्यान पत्रकारांना संबोधित करताना मॅक्रॉन म्हणाले होते, ट्रम्प इराण आणि इस्रायल यांच्यात संभाव्य युद्धविरामाच्या शक्यतांचा विचार करत होते.
पुन्हा एकदा चर्चा सुरू करणे आवश्यक : मॅक्रॉन -
मॅक्रॉन म्हणाले, "खरे तर बैठक आणि संवादाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. विशेषतः युद्धविरामासाठी आणि पुन्हा व्यापक चर्चा सुरू करण्यासाठी. आता दोन्ही पक्षा यावर पुढे चालतात की नाही, हे बघावे लागेल. आता मला वाटते की, पुन्हा एकदा चर्चा सुरू करणे आवश्यक आहे. नागरिकांची सुरक्षितता महत्वाची आहे."
फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन पुढे म्हणाले, परिस्थितीत तात्काळ बदल होईल असे वाटत नाही. मात्र, आपण युद्धबंदीचा मार्ग शोधू, असे आश्वासन अमेरिकेने दिले आहे. याशिवाय त्यांच्याकडे इस्रायलवर दबाव आणण्याची क्षमताही आहे. यामुळे परिस्थिती बदलू शकते.