"...तर इस्रायलचा विनाश निश्चित!"; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भविष्यवाणी! भारतीयांबद्दलही बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 13:06 IST2024-09-15T13:05:18+5:302024-09-15T13:06:18+5:30
US Elections: "अमेरिकन नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे हमासने ओलीस ठेवलेल्यांची अद्यापही सुटका झालेली नाही. यात अनेक अमेरिकन्सदेखील आहेत."

"...तर इस्रायलचा विनाश निश्चित!"; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी भविष्यवाणी! भारतीयांबद्दलही बोलले
अमेरिकेतील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रपतीपदाचे दावेदार डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धक विद्यमान उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्यावर निशाणा साधला आहे. "कमला हॅरिस या ज्यूंचा द्वेष करतात, त्यांनी निवडणूक जिंकली, तर इस्रायलचा विनाश निश्चित आहे. कारण डेमोक्रॅट्स हमासचे समर्थक आहेत. त्यांचे मोठे नेते पॅलेस्टाईनच्या नावावर हमासला प्रोत्साहन देतात. अमेरिकन नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे हमासने ओलीस ठेवलेल्यांची अद्यापही सुटका झालेली नाही. यात अनेक अमेरिकन्सदेखील आहेत," असे ट्रम्प यांनी म्हटेल आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प 'दैनिक भास्कर'सोबत बोलताना म्हणाले, "इंटरनॅशनल पॉलिसीमध्ये डेमोक्रॅट्स फेल ठरले आहेत. इस्राइल-हमास युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेने ताकदीची उपयोग केला नाहीत. खेदाची गोष्ट म्हणजे, राष्ट्रपती ज्यो बायडेन यांनी कसल्याही प्रकारची सल्लामसलत न करताच अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेचे हित अग्रस्थानी ठेवायला हवे.
असा आहे भारतासंदर्भातील प्लॅन -
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "भारतीय अमेरिकन्स माझे मोठे समर्थक आहेत. कारण, गेल्या निवडणुकीतही त्यांनी मला समर्थन दिले होते. माझ्यासाठी भारतीय लोकही मोठ्या प्रमाणावर निवडणूक प्रचार करत आहेत. मी खात्री देतो की, मी राष्ट्रपती झाल्यानंतर, भारताला माझ्यापेक्षा चांगला मित्र मिळू शकणार नाही."
अलीकडेच अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीयांना ग्रीन कार्ड देण्याची घोषणा -
ट्रम्प यांनी अलीकडेच अमेरिकेत शिकणाऱ्या भारतीयांना ग्रीन कार्ड देण्याची घोषणा केली आहे. अर्थात आता भारतीय विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी सर्व सुविधा मिळू शकतील. खरे तर, अमेरिकेतील हार्वर्ड आणि एमआयटी विद्यापीठांमधून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी पुन्हा भारतात परततात, यामुळे अमेरिकेचे मोठे नुकसान होते.