"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 07:31 IST2025-12-30T07:28:46+5:302025-12-30T07:31:37+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची फ्लोरिडातील मार-ए-लागो येथे भेट झाली.

"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
जगाचे लक्ष लागून राहिलेल्या एका ऐतिहासिक भेटीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची फ्लोरिडातील मार-ए-लागो येथे भेट झाली. या भेटीनंतर ट्रम्प यांनी नेतन्याहूंचे तोंडभरून कौतुक केले असून, "जर इस्रायलमध्ये चुकीचा पंतप्रधान असता, तर आज इस्रायलचे अस्तित्वच उरले नसते," अशा शब्दांत त्यांनी नेतन्याहूंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. या भेटीने मध्यपूर्वेतील युद्धाला आता कोणती नवी दिशा मिळणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
५ मिनिटांची चर्चा आणि ३ प्रश्नांचा निकाल
ट्रम्प आणि नेतन्याहू यांच्यातील ही भेट केवळ औपचारिक नव्हती, तर ती अत्यंत फलदायी ठरल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "आम्ही अवघ्या ५ मिनिटांत ३ मोठ्या समस्यांवर तोडगा काढला आहे. हा एक अतिशय चांगला ग्रुप असून आम्ही आधीच मोठी प्रगती केली आहे." युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी नेतन्याहूंसोबत चर्चा केल्याने ट्रम्प यांच्या 'ग्लोबल अजेंडा'ची चर्चा सुरू झाली आहे.
हमासने आता शस्त्रे खाली ठेवावीत!
गाझा पट्टीतील युद्धविरामाबाबत ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धविराम कराराच्या दुसऱ्या टप्प्यात आपल्याला वेगाने पुढे जायचे आहे, असे ट्रम्प म्हणाले. मात्र, हे करत असताना त्यांनी हमाससमोर मोठी अट ठेवली आहे. "हमासला आता पूर्णपणे नि:शस्त्र करावे लागेल," असे ट्रम्प यांनी ठणकावून सांगितले. ऑक्टोबरमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यातील करारानुसार इस्रायलने काही भागातून माघार घेतली होती, मात्र आता हमासने शासन सोडून शरणागती पत्करावी, अशी ट्रम्प यांची इच्छा आहे.
#WATCH | Florida, USA | President Donald Trump says, "We are going to be dealing on Gaza, that's why this very great Prime Minister is here. We are going to talk about Gaza, we are talking about a lot of things. We have about five major subjects that we are discussing and Gaza… pic.twitter.com/QRPC2XQxAG
— ANI (@ANI) December 29, 2025
इराण आणि हिजबुल्लाहला इशारा
या बैठकीत केवळ गाझाच नाही, तर इराण आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह यांसारख्या आव्हानांवरही सविस्तर चर्चा झाली. गेल्या वर्षभरात वॉशिंग्टनने इस्रायल-हमास, इस्रायल-इराण आणि इस्रायल-लेबनॉन यांच्यात तीनवेळा युद्धविराम घडवून आणला आहे. मात्र, इस्रायलचे शत्रू पुन्हा एकदा पलटवार करण्याच्या तयारीत असताना नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्याशी साधलेला हा संवाद इस्रायलसाठी कवचकुंडल ठरणार आहे.
या भेटीमुळे हे स्पष्ट झाले आहे की, आगामी काळात अमेरिका पुन्हा एकदा इस्रायलच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. ट्रम्प यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे हमास आणि इराणच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.