...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 18:49 IST2025-04-17T18:49:38+5:302025-04-17T18:49:57+5:30
Donald Trump Terrif War: अमेरिकेने चीनवर एकूण २४५ टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता हे युद्ध तीव्र होणार आहे.

...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टेरिफ वॉरवरून मोठे वक्तव्य केले आहे. टेरिफ वॉर सुरु करून अमेरिकेतच नाही तर जगभरात महागाई वाढविल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. अमेरिकेतही ट्रम्प आणि त्यांचे साथीदार एलन मस्क यांच्याविरोधात वातावरण होत आहे. लोकांमध्ये महागाई वाढल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अशावर आता ट्रम्प यांनी आपलीच पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
अमेरिकेने चीनवर एकूण २४५ टक्के टेरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून आता हे युद्ध तीव्र होणार आहे. परंतू, यामुळे अमेरिकेला मोठा फायदा होणार असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. या करामुळे अमेरिकेच्या महसुलात मोठी वाढ होणार आहे. याद्वारे अमेरिकनांच्या उत्पन्नावरील आयकर पूर्णपणे संपविला जाऊ शकतो, असे ते म्हणाले आहेत.
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. अमेरिकेत येणाऱ्या मालावर टेरिफ लादल्याने त्यातून एवढा पैसा जमा होईल की त्यातून आयकर कायमचा रद्द केला जाऊ शकतो, असे ट्रम्प म्हणाले. तसेच १८७० ते १९१३ दरम्यान जकात हा सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत होता आणि या काळात आपण जकातीतून इतके पैसे कमावले की आपण सर्वात श्रीमंत देश बनलो. त्याप्रमाणेच इतर देशांवर जकातींद्वारे कर लादून अमेरिकेला मोठा फायदा होईल, असेही ते म्हणाले.
ट्रम्पनी कर लादल्याने अमेरिकेत वस्तू महागल्या आहेत. हा पैसा अमेरिकन लोकांनाच खिशातून द्यावा लागत आहे. हा पैसा पाहता आयकरातून असा किती पैसा अमेरिकन भरत होते, असाही प्रश्न उपस्थित होणार आहे. दरम्यान, अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी महागाई वाढण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांच्या अंतर्गत धोरणात्मक बदलांमुळे फेडरल रिझर्व्हला अडचणीत टाकले गेले, असे त्यांनी म्हटले आहे. फेडरल रिझर्व्हला अज्ञात क्षेत्रात पाठविले गेले आहे. चीनसह इतरांवर लादलेले शुल्क हे या महागाईमागील कारण यामागे दिले जात आहे.