एका तरुणीने तिच्या लग्नाचं निमंत्रण ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्या एका महिला सहकाऱ्याला न दिल्याने तिने या तरुणीची तक्रार एचआरकडे केल्याची अजब घटना समोर आली आहे. त्यानंतर लग्नापूर्वीच एचआर टीमने या तरुणीला बोलावून तिच्या वर्तनाबाबत चौकशी सुरू केली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार रेडिटवर एका महिलेने हल्लीच तिच्यासोबत तिच्या महिला सहकाऱ्याने केलेल्या अजब वर्तनाबाबत पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट आता चर्चेचा विषय ठरली आहे. या महिलेने पोस्टमध्ये लिहिले की, मला लग्नाआधी माझ्या ऑफिसमधील एचआर टीमकडून बोलावणं आलं. तिथे माझी तक्रार करण्यात आली होती. मी लग्नाचं निमंत्रण न दिल्याने माझ्यासोबत काम करणाऱ्या एका महिला सहकाऱ्याने माझी एचआरकडे तक्रार केली होती. मी निमंत्रण न दिल्याने अपमानित आणि उपेक्षित ठेवल्यासारखं वाटलं. तसेच मी ऑफिसमध्ये शत्रुतापूर्ण वातावरण निर्माण केलं, अशी तक्रार तिने एचआरकडे केली.
या नववधूने रेडिटवर पुढे लिहिलं की, एचआरकडून माझ्याविरोधात आलेल्या तक्रारीबाबत ऐकल्यावर मी खूप निराश झाले. मला एचआरच्या मिटिंगमध्ये का बसावं लागतंय, असा प्रश्न मला पडला. मग मी क्वचितच ओळखते अशा सहकाऱ्यांना माझ्या लग्नासाठी बोलावणं मी आवश्यक समजत नाही, हे मी एचआर टीमला समजावून सांगितलं. हा एक खाजगी समारंभ आहे. त्याचं माझं काम आणि माझ्या ऑफिसशी काही देणं घेणं नाही, हे मी स्पष्टपणे सांगितले.
मी केलेल्या दाव्याशी एचआर टीममधील लोक सहमत झाले. तसेच त्यांनी त्वरित माझ्याविरोधात आलेली तक्रार रद्द केली. मात्र मी लग्नाला निमंत्रण न दिलेली माझी सहकारी अद्यापही नाराज आहे. तसेच ती आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत आहे. जेव्हा मी तिच्यासमोरून जाते तेव्हा ती तिरकस नजरेनं माझ्याकडे पाहते. तसेच कुजकट टोमणे मारते, असेही या तरुणीने सांगितले.