जगातील सर्वात शक्तीशाली रॉकेट पृथ्वीच्या बाहेर गेले खरे, पण परत येताना...; मस्क यांचा ९ वा प्रयत्नही वाया...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 10:10 IST2025-05-28T10:10:38+5:302025-05-28T10:10:49+5:30
स्टारशिप रॉकेट नष्ट झाले असले तरी त्याचा बुस्टर वाचविण्यात मस्कच्या कंपनीला यश आले आहे. अमेरिकेच्या खाडीमध्ये बुस्टरने हार्ड लँडिंग केले.

जगातील सर्वात शक्तीशाली रॉकेट पृथ्वीच्या बाहेर गेले खरे, पण परत येताना...; मस्क यांचा ९ वा प्रयत्नही वाया...
जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्तीच्या कंपनीचे शक्तीशाली रॉकेट पृथ्वीबाहेर जाऊन परत पृथ्वीवर परतणार होते. ही या रॉकेटची ९वी चाचणी होती. परंतू, दुर्दैव असे की ती देखील अपयशी ठरली आहे. लाँच झाल्यानंतर ३० मिनिटांनी या रॉकेटशी संपर्क तुटला आणि पृथ्वीच्या वातावरणात शिरत असताना ते नष्ट झाले. या स्टारशिपची अशी आकाशातच नष्ट होण्याची ही तिसरी वेळ आहे.
स्टारशिप रॉकेट नष्ट झाले असले तरी त्याचा बुस्टर वाचविण्यात मस्कच्या कंपनीला यश आले आहे. अमेरिकेच्या खाडीमध्ये बुस्टरने हार्ड लँडिंग केले. बॅकअप इंजिनची क्षमता तपासण्यासाठी एक सेंटर इंजिन जाणूनबुजून बंद करण्यात आले होते. सातव्या टेस्टमध्ये वापरलेला बुस्टर यात पुन्हा वापरण्यात आला होता. स्टारशिपला हिंदी महासागरात नियंत्रित पाण्याखाली उतरवायचे होते. परंतू तसे झाले नाही.
टेक्सासमधील बोका चिका येथून स्टारशिपचे प्रक्षेपण करण्यात आले होते. मस्क यांच्या स्पेसएक्सने याचे प्रक्षेपण केले होते. स्टारशिप नष्ट जरी झाले असले तरी यापुढे आणखी तीन प्रक्षेपणे खूप जलद केली जाणार आहेत. दर 3 ते 4 आठवड्यांनी ही प्रक्षेपणे केली जातील. मार्चमध्ये झालेल्या चाचणीत स्टारशिपची आठवी चाचणी घेण्यात आली होती. यावेळी प्रक्षेपणानंतर ७ मिनिटांनी बुस्टर वेगळा झाला आणि लाँच पॅडवर सुखरूप आला होता. परंतू, रॉकेट नष्ट झाले होते. ४ इंजिन बंद पडल्याने स्टारशिपची ही चाचणी अयशस्वी ठरली होती.
एवढ्यावेळा अपयश येऊनही मस्क काही हार मानायला तयार नाहीत. पहाटे प्रक्षेपण झाल्याने फ्लोरिडाच्या आकाशात स्फोट होताना आणि अवशेष जळत येताना दिसत होते. यामुळे मियामी, ऑर्लॅंडो, पाम बीच आणि फोर्ट लॉडरडेल येथील विमानतळांवरील उड्डाणे थांबविण्यात आली होती.