शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 05:40 IST2025-10-11T05:40:24+5:302025-10-11T05:40:44+5:30
२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांत मचाडो यांनी सलग १२ वर्षे सत्तेत असलेले हुकूमशाही प्रवृत्तीचे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माडुरो मोरेस यांच्या विरोधात रणशिंग फुंकले.

शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
ऑस्लो : दोन दशकांपूर्वी एकेकाळचा लोकशाहीप्रधान असलेला व्हेनेझुएला देश हुकूमशाहीकडे वळाला आणि या देशाचे राजकीय व सांस्कृतिक स्वरूप बदलले. अशा अस्थिर परिस्थितीत २० वर्षांपूर्वी मारिया कोरिना मचाडो (५८) हे नेतृत्व जनतेतून जन्मास आले. मचाडो यांनी ‘सुमाते’ नावाचे एक संघटन स्थापन केले. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी व्हेनेझुएलात मुक्त वातावरणात, निष्पक्षपाती व पारदर्शी निवडणुका घेण्याची मागणी केली. पण त्यांच्या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केले. पण आपल्या भूमिकेवरून त्या तसूभरही हलल्या नाहीत.
२०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांत मचाडो यांनी सलग १२ वर्षे सत्तेत असलेले हुकूमशाही प्रवृत्तीचे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस माडुरो मोरेस यांच्या विरोधात रणशिंग फुंकले. पण, मचाडो यांना निवडणुका लढवण्यात मनाई करण्यात आली. त्याविरोधात मचाडो यांनी सर्व विरोधकांशी संवाद साधून एक मोट बांधली. त्यांनी प्रमुख विरोधी पक्षनेते एडमंडो गोन्झालेझ ऊरुत्तीया यांना बाहेरून पाठिंबा दिला. त्यांच्या या राजकीय चालीमुळे विखुरलेले लाखो कार्यकर्ते संघटित झाले. या कार्यकर्त्यांना निवडणुकांमध्ये निरीक्षक म्हणून प्रशिक्षण दिले गेले. तरीही माडुरो मोरेस हे निवडणुकांमध्ये घोटाळे करून निवडून आले. त्यामुळे आजही काही देशांनी माडुरो मोरेस यांना मान्यता दिलेली नाही.
बॅलट की बुलेट?
माडुरो मोरेस यांच्या राजवटीत येथे मोठी आर्थिक व मानवी अरिष्टे येऊन गेली. देश गरिबीच्या खाईत ढकलला गेला. विषमता वाढली.
सुमारे ८० लाख नागरिकांनी देशाबाहेर पलायन केले. सरकारची दमनशाही सुरूच आहे. निवडणुकांत प्रचंड गैरप्रकार झाले. विरोधकांना तुरुंगात टाकण्याच्या शेकडो घटना घडल्या आहेत.
अशा कठीण परिस्थितीत मचाडो यांनी रस्त्यावरची आंदोलने सोडली नाहीत. त्यांनी लोकांपुढे जाऊन ‘बॅलट की बुलेट’ असा महत्त्वाचा प्रश्न ठेवला आहे व लोकशाही हक्कासाठी संघर्ष सुरूच ठेवला आहे.
शांततेपेक्षा राजकारणावर भर : व्हाइट हाउसची नाराजी
आपणच यंदाच्या नोबेल शांतता पुरस्काराचे दावेदार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वक्तव्य करत होते. पण त्यांना या पुरस्काराने हुलकावणी दिली. यावर व्हाइट हाऊस प्रशासनाने नाराजी व्यक्त करत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे जगात शांतता राखावी म्हणून, मानवी हत्याकांड थांबावीत म्हणून प्रयत्न करत राहतील. स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर पर्वत हलवू शकणारा त्याच्यासारखा माणूस पुन्हा कधीच होणार नाही. नोबेल समितीने शांतता नव्हे तर राजकारण आणले, असे व्हाइट हाऊसने म्हटले आहे.