लोकसभेत ऑपरेशन सिंदूरबाबत भारत सरकारच्या विधानानंतर, पाकिस्तानने पुन्हा एकदा धमक्या दिल्या आहेत. पाकिस्तान सरकारने भारतीय संसदेत चर्चेदरम्यान केलेले आरोप 'निराधार' असल्याचे म्हटले आहे. पाकिस्तानने भारतीय अधिकाऱ्यांना अप्रत्यक्षपणे इशाराही दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीमध्ये कोणत्याही तिसऱ्या पक्षाची भूमिका नव्हती.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, 'पहलगाम हल्ल्याबाबत कोणताही पुरावा किंवा विश्वासार्ह तपास न करता भारताने पाकिस्तानवर हल्ला केला हे जगाला माहीत आहे. भारताला त्याचे कोणतेही धोरणात्मक यश मिळवता आले नाही. दुसरीकडे, भारतीय लढाऊ विमाने आणि लष्करी तळ उद्ध्वस्त करण्यात पाकिस्तानचे यश हे एक निर्विवाद सत्य आहे, असंही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
पाकिस्तान सरकारच्या विधानात भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या सशस्त्र दलांचे झालेले नुकसान स्वीकारावे यावर भर देण्यात आला आहे.'युद्धविरामाचा निर्णय घेण्यात तिसऱ्या पक्षाची भूमिका देखील स्वीकारली पाहिजे, असंही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार दावा केला आहे की त्यांनी व्यापाराच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील संघर्ष थांबवला आहे.
भारताने स्पष्ट केले
पंतप्रधान मोदींनी मंगळवारी काँग्रेसवर पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप केला. जगातील कोणत्याही नेत्याने भारताला 'ऑपरेशन सिंदूर' थांबवण्यास सांगितले नाही. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आणि म्हणाले की या ऑपरेशन दरम्यान संपूर्ण जगाने त्याचे समर्थन केले, परंतु सैनिकांच्या शौर्याला मुख्य विरोधी पक्षाचा पाठिंबा मिळाला नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणल्याच्या दावा आणि विरोधी पक्षांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, 'जगातील कोणत्याही नेत्याने आम्हाला ऑपरेशन (सिंदूर) थांबवण्यास सांगितले नाही.' ऑपरेशन सिंदूरचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, भारतीय सैन्याने २२ एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला २२ मिनिटांत निश्चित लक्ष्यासह आणि निश्चित केलेल्या कारवाईनुसार घेतला.